Ganesh Chaturthi 2022 LIVE Updates : सुखकर्ता... दुखहर्ता... दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव, घराघरांत बाप्पाच्या आगमनाची लगबग
Ganesh Chaturthi 2022 LIVE Updates : दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साजरा करताना भक्तांचा उत्साह शिगेला, चांद्यापासून बांद्यापर्यंत गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग
LIVE
Background
Ganesh Chaturthi 2022 : गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया....अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. आज 31 ऑगस्ट... आज श्री गणेश चतुर्थी... (Ganesh Chaturthi) ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली आणि तो दिवस अखेर उजाडला आहे. आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन होत आहे. सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखाव्यात आणि मखरात गणराज आज विराजमान होतील. बाप्पाची आज विधिवत प्राणप्रतिष्ठा करुन दहा दिवसांच्या उत्साहपर्वाला (Ganesh Utsav 2022) प्रारंभ होईल. बाप्पाच्या आगमनाने घराघरात मंगलमय वातावरण आहे. पुढील दहा दिवस बाप्पाची सजावट, आरत्यांचे स्वर, गौराईचे आगमन, गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष ऐकायला मिळणार आहे.
गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त
बाप्पाचं आगमन हा अत्यंत आनंदाचा दिवस असतो. आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. पंचांगाप्रमाणे गणपती प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त पहाटे पावणे पाचपासून मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी दोनपर्यंत आहे, असं प्रसिद्ध दाते पंचांगचे प्रमुख मोहन दाते यांनी दिली आहे. "ही स्थापना करताना आपण साधारणतः ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पावणे पाचपासून मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी दोनपर्यंत आपल्या सोयीने कोणत्याही वेळी करु शकता. त्यासाठी वेगळे विशेष कोणतेही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. घरातली सकाळची पूजा झाली की, त्यानंतर गणरायची उत्साहात स्थापना करावी. ज्यांच्याकडे जितक्या दिवसचा गणपती आहे त्यांनी त्याप्रमाणे सकाळी पूजा आणि संध्याकाळी आरती करावी," असं मोहन दाते यांनी सांगितलं.
इतर दिवशीही गजबजलेली मुंबई आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने रोषणाईने आणखी उजळून निघाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात गणपतींच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा सुरु होतील. तर गौरी आणि सात दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडाळांतील देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी आणखी वाढेल.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांची रांग
लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी रात्रभर पाहायला मिळाली. गणेश भक्त रात्रभर रांगेत उभे असल्याचे दिसून आले. केवळ मुंबईतीलच नव्हे तर पुणे, कोल्हापूर आणि अगदी राजस्थान राज्यातूनही भाविक रांगेत उभे असल्याचे दिसून आले. भाविकांच्या दोन वेगवेगळ्या रांगा आहेत. एक रांग मुख दर्शनासाठी तर दुसरी रांग चरणस्पर्शासाठी आहे.
सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी
तर मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पहाटे पावणे पाचच्या सुमारास काकड आरती पार पडली. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठीही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्यात भक्तिमय वातावरणात झाले आहे. दोन वर्षांनंतर कोरोनाच्या निर्बंधामधून मुक्त झाल्यानंतर गणेशभक्तांमध्ये जल्लोषाचं वातावरण दिसत आहे.
शिंदे गटातील आमदार आपापल्या विभागातील गणेश मंडळांना भेट देणार
दरम्यान शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे गटातला प्रत्येक आमदार आपल्या विभागातल्या गणपती मंडळांना भेट देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या गणेशोत्सवात अनेक सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देणार आहेत. शिंदे गटाच्या झालेल्या बैठकीत या गणेशोत्सवानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे.
ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं स्वागत
गणपती बाप्पाची मिरवणूक म्हटलं की आपल्याला तरुण मुलांचा उत्साह नेहमीच पाहायला मिळतो. जणू काही गणपती उत्सव म्हणजे पुरुषांची मक्तेदारी आहे, मात्र बाप्पाचा उत्सव ही काही पुरुषांची मक्तेदारी नव्हे तरुणही या मध्ये मागे नाहीत. याचा प्रत्यय जळगावच्या मुळजी जेठा महविद्याल्याच्या तरुणींनी दाखऊन दिला आहे. मुळजी जेठा महाविद्यालयाच्या वस्ती गृहात मुलींच्या वतीने दर वर्षी बाप्पाची स्थापना केली जात असते. यंदाही ती करण्यात आली आहे. या बाप्पाच्या स्थापनेच्या निमित्ताने वसतिगृहातील मुली या बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होत असतात. आज झालेल्या मिरवणुकीत शेकडो मुलींनी सहभाग घेत ढोल ताशाच्या आणि लेझिमच्या तालावर एक सुरात नृत्य करून मिरवणुकीचा आनंद घेतला असल्याचं पाहायला मिळालं आहे.
शिंदे गटात सहभागी होतानाचा जो निर्णय घेतला त्यावेळी गणपती बाप्पाच नव्हे तर सर्व देव आठवले - मंत्री गुलाबराव पाटील
95 वर्ष पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारं मंडळ म्हणजे मुंबईतील गिरगावचा राजाचं मंडळ
Kalyan News : कल्याणमधील विजय तरुण मंडळाच्या चलचित्र देखाव्यावर पोलिसांकडून कारवाई
Kalyan News : सार्वजनिक गणेश मंडळांचं आकर्षण म्हणजे गणपतीची मूर्ती आणि देखावा. मुंबई आणि उपनगरातील प्रसिद्ध गणेश मंडळांपासून गल्लोगल्ली असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये विविध विषयावरचे देखावे साकारले जातात. परंतु कल्याणमधील (Kalyan) विजय तरुण मंडळाने तयार केलेला देखावा चांगलाच चर्चेत होता. पोलिसांनी या देखाव्यावर आक्षेप घेत आज पहाटेच्या सुमारास त्यावर कारवाई करत सामुग्री जप्त केली. शिवसेनेतील (Shiv Sena) बंडखोरीबाबतचा चलचित्र देखावा या गणेश मंडळाने तयार केला होता. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा विजय तरुण मंडळाने निषेध केला आहे. देखाव्यात काहीच आक्षेपार्ह नव्हतं. या कारवाईविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असून निषेध म्हणून यंदा गणेश मूर्तीची स्थापना करणार नाही, असं मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी सांगितलं.