राहुल नार्वेकरांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न, आमदारांची परदेशवारी करणाऱ्या कंपनीकडे मागितले पैसे
आमदारांची परदेश वारी करणाऱ्या कंपनीकडे तोतया लोकांनी पैसे मागितले होते. टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडे अध्यक्षांच्या नावे पैसे मागितले.
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आली आहे. नार्वेकर यांच्या नावाने तोतया इसमाकडून फोनवर पैशांची मागणी केली आहे. या प्रकरणी दोन इसमांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस (Marine Drive Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आमदारांची परदेश वारी करणाऱ्या कंपनीकडे राहुल नार्वेकरांच्या नावे तोतया लोकांनी पैसे मागितले होते.
आमदारांची परदेश वारी करणाऱ्या कंपनीकडे तोतया लोकांनी पैसे मागितले होते. टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडे अध्यक्षांच्या नावे पैसे मागितले. नार्वेकर यांच्या नावाने तोतया इसमाकडून फोनवरून पैशांची मागणी केल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्याला संशय आला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने फसवणूक टळली आहे. नार्वेकर यांच्या स्विय सहाय्याकडून मरीन ड्राईव्ह पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
नेमका काय आहे प्रकार?
विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना परदेश वारी घडवण्याचे कंत्राट एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीला देण्यात आलेले आहे. या कंपनीच्या कार्यालयात भर दुपारी तीन वाजता दोन इसम शिरले. या दोन्ही आरोपींनी कंपनी कर्मचाऱ्यांकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाने पैशांची मागणी केली. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी फोनवरून संवाद साधून देण्याचे नाटकही केले. धक्कादायक बाब म्हणजे फोनवरून एका तोतया इसमाने नार्वेकर यांच्या नावाने कर्मचाऱ्यांशी बातचीतही केली.
कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने फसवणूक टळली
नार्वेकर यांच्या नावाने तोतया इसमाकडून फोनवरून पैशांची मागणी केल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्याला संशय आला. मात्र या प्रकरणात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी दोन्ही आरोपींनी कर्मचाऱ्यास धमकी देऊन तिथून पळ काढला. हा सर्व प्रकार नार्वेकर यांच्या कानावर पडताच त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. तसेच त्यांच्या स्विय सहाय्यकाकडून तात्काळ मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.