Bhagat Singh Koshyari : राज्यपालपदाचा राजीनामा का दिला? भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट सांगितले
Bhagat Singh Koshyari : राज्यपालपदाचा राजीनामा का दिला, याबाबत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर मौन सोडले आहे.
Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून निवृत्त झाल्यानंतर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आपले मौन सोडले. 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत भगतसिंह कोश्यारी यांनी अनेक मुद्यांवर स्पष्टपणे भाष्य केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत आपण राज्यपालपदावरून निवृत्त का झालो, याबद्दल अखेर मौन सोडले आहे.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले की, राज्यपालपदी काहीशा इच्छेविरोधात आलो होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालपदाची जबाबदारी दिली होती. त्यांनी केलेला आग्रह मला मोडता आला नाही. त्यामुळे राज्यपालपदाची जबाबदारी घेतली असल्याचे कोश्यारी यांनी सांगितले. मी ही जबाबदारी पार पाडेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींना होता. त्या विश्वासाच्या जोरावर मी ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे कोश्यारी यांनी सांगितले.
राज्यपालपद का सोडलं?
राज्याच्या राज्यपालपदी आल्यानंतर मला उत्तराखंडच्या लोकांसाठीदेखील आपण काहीतरी करायला हवं अशी भावना निर्माण झाली होती. त्यानंतर काही महिन्यांआधीच मी राजकारणातून आणि राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर मी तशीच इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली होती. आयुष्याच्या उतारवयात उत्तराखंडमधील जनतेची सेवा करण्यासाठी मी राजकारण सोडले असल्याचे कोश्यारी यांनी म्हटले.
राज्याच्या अनेक जिल्ह्यांत फिरणारा राज्यपाल
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले की, आतापर्यंत राज्यपालपदी असलेल्या व्यक्तींपैकी कदाचित मीच पहिला राज्यपाल असेल ज्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या. जिजाऊंचे जन्मस्थळ असणाऱ्या सिंदखेडराजालादेखील भेट देणारा मीच पहिला राज्यपाल असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कारकिर्दीत मी अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या, तेथील काही गोष्टी समजून घेतल्या असल्याचे त्यांनी सांगितले. लोकं कोविडचे कारण देऊन घराबाहेर पडत नव्हते. त्यावेळी मी शिवनेरी किल्ल्याला भेट दिली होती, मला कोविड झाला नव्हता, असेही कोश्यारी यांनी म्हटले.
ते काम जनतेचे, राज्यपालांचे नाही
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी असताना, राज्यातील महाविकास आघाडीबाबत, घडामोडींबाबत आपले आकलन काय होते, असा प्रश्न विचारला असता कोश्यारी यांनी म्हटले की, राज्यातील सरकारचे, राजकीय घडामोडींचे आकलन करण्याचे काम राज्यातील जनतेचे आहे. राज्यपालांचे ते काम नसल्याचेही कोश्यारी यांनी स्पष्ट केले.
पाहा व्हिडिओ: Bhagat Singh Koshyari EXCLUSIVE: पहाटेच्या शपथविधीचा सर्वात मोठा साक्षीदार,भगतसिंग कोश्यारी