अंबरनाथच्या माजी उपनगराध्यक्षांचा उपचारांअभावी मृत्यू, कोरोना रिपोर्ट नसल्याने हॉस्पिटलचा दाखल करायला नकार
मृत्यूच्या दोन दिवसांनी प्रदीप खानविलकर यांचा कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह आला. त्यामुळे ज्यांनी कोरोनाची टेस्ट केलेली नाही किंवा ज्यांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत, अशा लोकांना सरकारी नियम आणि हॉस्पिटलच्या आडमुठ्या भूमिकेमुळे जीव गमवावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कल्याण : अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष आणि ज्येष्ठ शिवसैनिक प्रदीप खानविलकर यांचा उपचाराअभावी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरोना टेस्टचा रिपोर्ट नसल्याने हॉस्पिटलने त्यांना दाखल करून घ्यायला नकार दिल्याचा आरोप खानविलकर यांच्या पत्नीने केला आहे.
स्वतंत्र अंबरनाथ नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर प्रदीप खानविलकर हे शिवसेनेचे पहिले उपनगराध्यक्ष होते. 8 जून रोजी सकाळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांची पत्नी त्यांना उल्हासनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तिथे त्यांच्यावर जुजबी उपचार करून कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर त्यांनी अंबरनाथला येऊन कोरोना टेस्ट केली. संध्याकाळच्या सुमारास त्यांना पुन्हा छातीत दुखू लागल्याने पत्नीने त्यांना घेऊन अंबरनाथचं हॉस्पिटल गाठलं. मात्र कोरोना टेस्टचा रिपोर्ट नसल्यानं हॉस्पिटलने त्यांना दाखल करून घ्यायला नकार दिला आणि पुन्हा घरी पोहोचेपर्यंत त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
दुर्दैवी गोष्ट म्हणजे मृत्यूच्या दोन दिवसांनी त्यांचा कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह आला. त्यामुळे ज्यांनी कोरोनाची टेस्ट केलेली नाही किंवा ज्यांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत, अशा लोकांना सरकारी नियम आणि हॉस्पिटलच्या आडमुठ्या भूमिकेमुळे जीव गमवावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्यानंतर प्रदीप खानविलकर यांच्या पत्नी उर्मिला खानविलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्याकडे लक्ष देण्याचं भावनिक आवाहन केलं आहे. केवळ रिपोर्ट नाहीत म्हणून आज प्रदीप खानविलकरांचा जीव गेला, असे आणखी बळी जाऊ नयेत, अशी अपेक्षा उर्मिला खानविलकर यांनी व्यक्त केली.