Ashok Chavan : सरकारच्या विरोधात बोललं तर जीवे मारण्याचा प्रयत्न होतो; अशोक चव्हाण यांचा गंभीर आरोप
Ashok Chavan : सरकारचं गुणगान गायलं तर बरं आहे, अन्यथा विरोधात बोललं तर जीवे मारण्याचे प्रयत्न होत आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारवर केला आहे.
Nanded News Update : सरकारचं गुणगान गायलं तर बरं आहे, अन्यथा विरोधात बोललं तर जीवे मारण्याचे प्रयत्न होत आहे, जे आणीबाणीच्या काळात घडलं नाही ते आता होतंय, असा गंभीर आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan) यांनी सरकारवर केलाय. नांदेडमध्ये आज संगीत शंकर दरबार सोहळ्यात ख्यातनाम साहित्यिक ना. धो. महानोर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलाय. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावले जात असल्याची खंत व्यक्त करत सरकारवर टीका केलीय.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, काँम्रेड गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यासारख्या विचारवंताच्या हत्या झाला. परंतु या हत्यांचा फक्त तपास सुरू आहे. त्याचं पुढं काहीच होत नाही. आणीबाणीतही जे घडले नाही, अशा घटना सध्या देशात घडत आहेत. सरकारचे गुणगान गायलं तर बरे, अन्यथा विरोधात बोलले तर काही खरे नाही, अशी परिस्थिती आहे. सरकार विरोधात बोलले तर लोकांना जीवे मारण्याचे प्रयत्न होत आहेत. ही आजची शोकांतिका आहे, अशी खंत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
सरकारच्या विरोधात बोललं तर काही खरे नाही
"आज देशात वातावरण बदलत आहे. आपण मोकळेपणाने बोलू शकतो का? सरकारचे गुणगान गायलं तर सगळे चांगले आहे. तुमचा सरकारकडूनच सन्मान केला जाईल. पण, जर विरोधात बोलले तर मात्र, काही खरे नाही. विरोधात बोलणाऱ्या लोकांना जीवे मारण्यापर्यंतच्या घटना घडतात, असा आरोप यावेळी अशोक चव्हाण यांनी केला.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी यापूर्वीच आपला घातपात घडवण्याची भीती व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी नांदेडमध्ये पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार देखील दिली आहे. "माझ्या लेटरपॅडचा दुरुपयोग होत असून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे, माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव आहे. आपल्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाच्या कार्यकाळात काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील स्वाक्षरी कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहे. याची कुणकुण अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेड देखील मिळाले होते, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला होता.
माझ्यावर पाळत ठेवली जात आहे...
"आपल्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जात असून, तो व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करत आहे. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला होता.
महत्वाच्या बातम्या