Telgi Scam : तेलगी घोटाळ्यावर अनिल गोटे यांचे सनसनाटी आरोप; तेलगीला वाचवण्यासाठी....
Anil Gote On Telgi Scam : तेलगी घोटाळ्याचा लॉजिकल एन्ड झालेला नाही. तेलगीला त्या-त्या वेळेच्या राज्यकर्त्यांना वाचवलं असल्याचा आरोपही अनिल गोटे यांनी केला.
धुळे: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बीडमधील सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आरोप करताना तेलगी घोटाळ्याचा उल्लेख केला आणि त्यानंतर या घोटाळ्याची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. तेलगी घोटाळा प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागलेले माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी आता सनसनाटी आरोप केले आहे. 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक दावे केले आहेत.
तेलगी घोटाळ्यातले मुख्य आरोपीपैकी एक माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले की, तेलगी घोटाळ्याचा लॉजिकल एन्ड झालेला नाही. तेलगीला त्या-त्या वेळेच्या राज्यकर्त्यांना वाचवलं असल्याचा आरोपही अनिल गोटे यांनी केला.
तेलगीच्या नार्को टेस्टमध्ये छगन भुजबळ, शरद पवार, अशोक चव्हाण, एस.एम. कृष्णा अशा नेत्यांची नाव आलेली होती.
छगन भुजबळ यांनी आता या प्रकरणाचं नाव काढायची गरज नव्हती त्यावेळेला छगन भुजबळ यांचं फक्त तेलगी प्रकरणच नव्हे तर रॉकेल घोटाळ्यामध्ये सुद्धा नाव येत होतं. छगन भुजबळ आत्ता या प्रकरणात आपला राजीनामा का घेतला असं सांगत आहे. त्याचं कारण त्यांना हे सुचवायचं आहे की नार्को टेस्टमध्ये जसं माझं नाव होतं तसंच शरद पवार यांचे नाव होतं परंतु केवळ माझा राजीनामा घेतला गेला. जितेंद्र आव्हाड यांनी कुठल्यातरी अदृश्य हाताने काही नाव काढली हे बरोबर आहे. म्हणूनच तेलगी घोटाळ्याचा लॉजिकल एन्ड झालेला नाही असा माझा दावा असल्याचे गोटे यांनी सांगितले. तेलगी घोटाळ्याचा संपूर्ण वापर हा कोणालातरी वाचवण्यासाठी आणि कोणालातरी गोवण्यासाठी झाला असल्याचा दावा करताना गोटे यांनी तत्कालीन राज्यातल्या आणि देशातल्या सर्व नेत्यांचा तेलगी प्रकरणात सहभाग होता. त्यावेळेसच्या देशातल्या सर्वोच्च नेत्यांनी तेलगीला वाचवलं. त्यावेळेसच्या अर्थमंत्र्यांनी तेलगीला क्लीन चीट दिली होती याची आठवणही गोटे यांनी करून दिली.
मोपलवार घोटाळ्याचा सूत्रधार, मराठी अधिकाऱ्यांना त्रास
तेलगी घोटाळ्यातल्या सूत्रदारांपैकी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार असल्याचा आरोपही गोटे यांनी केला. मी चार वर्षे जेलमध्ये राहिलो तरी मला तेलगी प्रकरणांमध्ये शिक्षा झालेली नाही. तेलगीकडून मी एक लाख रुपयांची देणगी स्वीकारलेली होती मी स्वतःच कोर्टामध्ये स्वतः सांगितले असल्याचे अनिल गोटे यांनी म्हटले.
ज्या अधिकाऱ्यांनी तेलगीचे स्टॅम्प पकडले त्या मराठी अधिकाऱ्यांना या प्रकरणांमध्ये खूप त्रास सहन करावा लागला. याउलट ज्यांनी एकही स्टॅम्प पेपर पकडला नाही असे सुबोध जयस्वाल या अधिकाऱ्याने स्वत: चे कौतुक करून घेतले. याच सुबोध जयस्वालला तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ हे संरक्षण देत असल्याचा आरोप गोटे यांनी केला.
तेलगीने एकही स्टॅम्पपेपर छापला नाही
अब्दुल करीम तेलगी याचे एकही बोगस स्टॅम्प छापलेला नाही. नाशिक येथील प्रेसमधून बाहेर पडत असलेल्या स्टॅम्पची हेराफेरी तो करत असल्याचा दावा अनिल गोटे यांनी केला. 2015 मध्ये तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण हे सगळं लक्षात आणून दिलं होतं. परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचे हात चिखलाने माखलेले असल्याचेही गोटे यांनी मुलाखतीत म्हटले.