केळीच्या फुलापासून मधुमेह आणि हिमोग्लोबिन वाढविणाऱ्या सूप निर्मितीसाठी डॉ. तेजोमई भालेराव यांना पेटंट
भारतातील कुपोषण आणि मधुमेह कमी होईल,त्यासाठी सरकारने आपल्याला मदत करावी जेणे करून आपल्याला संशोधनाचा फायदा तळागाळातील जनतेला व्हावा असा भालेराव यांचा मानस आहे.
![केळीच्या फुलापासून मधुमेह आणि हिमोग्लोबिन वाढविणाऱ्या सूप निर्मितीसाठी डॉ. तेजोमई भालेराव यांना पेटंट For the production of diabetes and hemoglobin enhancing soup from banana flower Patent Dr. Tejomai Bhalerao केळीच्या फुलापासून मधुमेह आणि हिमोग्लोबिन वाढविणाऱ्या सूप निर्मितीसाठी डॉ. तेजोमई भालेराव यांना पेटंट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/08020208/WhatsApp-Image-2021-01-07-at-7.24.32-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावच्या डॉ भूषण देव यांनी वाया जाणाऱ्या केळीच्या खोडापासून प्रायोगिक तत्वावर कागदाची निर्मिती करत केळीच्या खोडाची उपयोगिता सिद्ध केली होती. त्याच पद्धतीने केळीच्या फुलाचं सूप बनवून पिल्यास ते मानवी आरोग्यासाठी केवळ फलदायक तर आहेच. पण त्यापासून मधुमेह सारख्या दुर्धर आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपयोग होऊ शकतो आणि शरीरातील प्रतिकार शक्ती वाढण्याबरोबर हिमोग्लोबिन देखील वाढण्यात मदत होत असल्याचं संशोधन जळगांवच्या तेजोमई भालेराव यांनी केलं आहे. त्यांच्या या संशोधनाला भारत सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाने ही मान्यता देत त्यांना पेटंट दिले आहे. डॉ. भूषण देव आणि तेजोमई भालेराव यांच्या या प्रयोगामुळे वाया जाणाऱ्या केळीच्या खोडाचा आणि फुलाचा हा वापर शेतकऱ्यांसाठी पुढील काळात पर्वणी ठरण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते. देशाच्या 27 टक्के उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यात होत असते. त्यामुळे जळगांव जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही केळी पिकावर अवलंबून असल्याच दिसून येते. जळगाव जिल्ह्यात केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जात असल तरी गेल्या काही वर्षात केळी पिकावर येणारी अनेक संकटे पाहता केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे केळी पिकात आता केवळ केळीच्या फळावर अवलंबून न राहता त्याच्या झाडाचे अन्य पर्याय शोधून त्याची उपयोगिता वाढून त्या पासून अर्थार्जन करणे आवश्यक आहे. ही गोष्ट जाणून घेत डॉ भूषण देव यांनी वाया जाणाऱ्या केळीच्या खोडापासून प्रायोगिक तत्वावर कागदाची निर्मिती यशस्वी केली होती.
त्यानंतर आता प्रा. डॉ. तेजोमई भालेराव यांनी केळीच्या वाया जाणाऱ्या फुलाला सुकवून आणि अन्य घटक समावेश करून त्यापासून सूप बनविले आहे. हे सूप मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी आहेत. शिवाय त्याच्या नियमित प्राशनाने मधुमेहावर नियंत्रण मिळविण्या सोबत शरीराची रोग प्रतिकार क्षमता वाढविणे,रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यासही मदत होत असल्याचा दावा तेजोमई भालेराव यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याला भारत सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाने मान्यता देत त्यांना वीस वर्षासाठी पेटंटही दिले आहे. या पेटंटच्या माध्यमातून भारतातील कुपोषण आणि मधुमेह कमी होईल,त्यासाठी सरकारने आपल्याला मदत करावी जेणे करून आपल्याला संशोधनाचा फायदा तळागाळातील जनतेला व्हावा असा भालेराव यांचा मानस आहे.
तेजोमई भालेराव या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पर्यावरण विभागात कार्यरत होत्या. याच काळात त्यांनी दिल्लीच्या डी एस टी महिला शास्त्रद्न्य योजने अंतर्गत शेत जमिनी मधील रासायनिक किटनाशकाचा अंश जैविक पद्धतीने कमी करण्याच तीन वर्षे संशोधन केले. हे करत असतानाच त्यांना केळीच्या झाडाच्या वाया जाणाऱ्या घटकाचा उपयोग केला तर शेतकऱ्यांना अधिक फायदा होऊ शकेल हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेत लीलावती रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून त्यांनी आपल्याला पूर्ण पणे संशोधनात गुंतवून घेतले आहे. त्याचा परिणाम म्हणून म्हणून त्यांनी बहुउपयोगी केळी फुलाचं सूप त्यांनी समोर आणलं आहे
जगभरात भारत हा सर्वाधिक केळी पिकविणारा देश आहे. केळीच्या पिकातील पोषण मूल्य ,त्याची चव आणि किंमतीचा विचार केळी च फळ हे देशातील कोणत्याही थरातील जनतेला परवडणारे असल्याने त्याचा वापर ही मोठ्या प्रमाणावर आपल्याकडेकडे केला जातो. केळीच्या फळासोबतच त्याच्या बहुगुणी झाडामध्ये कॅल्शियम,आयर्न,फॉस्परस ,पोटॅश या सारख्या घटकांच प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने हे फळ आरोग्याच्या दृष्टीने बहु उपयोगी राहिले आहे. मात्र केळीच फुल किंवा त्याला खान्देशात कमळ म्हटलं जातं त्याचा वापर भारतातील केरळ, तामिळनाडू, आंध्र सह उत्तरेतील काही राज्यात आणि विदेशातील मलेशिया फिलिपिन्ससह काही देशात सूप आणि भाजी बनविण्यासाठी केला जातो. मात्र महाराष्ट्रात मात्र त्या बाबतची फारशी जागृती नसल्याने हे फुल फेकले जात असते. मात्र त्यातील आयर्न ,फॉस्परस ,कॅल्शियम सारख्या घटकाच पोषण मूल्य पाहता त्याचा वापर हा केला गेला पाहिजे. जेणे करून आपली प्रतिकार क्षमता वाढते,मधूमेह नियंत्रण होणे, हिमोग्लोबिन वाढणे हे फायदे होत असल्याचे पाहायला मिळत असल्याच सांगून जैन उद्योग समूहाचे केळी शास्त्रज्ञ डॉ के बी पाटील यांनी तेजोमई भालेराव यांच्या संशोधनाच एक प्रकारे समर्थन केल्याच पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)