लसीकरण वेगाने पूर्ण करणाऱ्या देवळी-पुलगाव मतदारसंघातील ग्रामपंचायतीना पाच लाखांचा निधी : आमदार रणजित कांबळे
आमदार रणजित कांबळे यांनी गावांच्या पूर्ण लसीकरणावर भर दिला आहे. लसीकरण वेगाने पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीना पाच लाखांचा निधी दिला जाईल असं त्यांनी सांगितलं. देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रातील लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतींना हा निधी देण्यात येणार आहे.
वर्धा : ग्रामीण भागातील लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. ग्रामीण भागात लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ज्या ग्रामपंचायती लसीकरण वेगाने पूर्ण करतील, अशा ग्रामपंचायतींना विशेष बाब म्हणून आमदार निधीतून पाच लाख रुपयांचा निधी देण्यात येईल. देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रातील लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतींना हा निधी देण्यात येणार आहे. त्याकरता नियोजन करावे, असे निर्देश आमदार रणजित कांबळे यांनी अधिकारी, कर्मचारी, सरपंचांच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये दिले.
देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघाकरता आमदार रणजित कांबळे यांनी ऑनलाईन मीटिंग घेतली. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, तहसीलदार रमेश कोळपे, राजेश सरवदे, श्रीराम मुंदडा, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंचांची उपस्थिती होती.
गावात 90 टक्के लसीकरण पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींनाही आमदार निधीतून पाच लाख रुपयांचा विशेष निधी देण्यात येईल, असे सांगत, आमदार कांबळे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचावाकरता लसीकरणाची गरज व्यक्त केली. सध्या 45 वर्षांवरील लसीकरण संथगतीने सुरु आहे. लवकरच 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरु होईल, तेव्हा केंद्रावर गर्दी होईल. त्यामुळे 45 वर्षांवरील सर्वांनी तातडीने लसीकरण करावे, असे आमदार कांबळे यांनी सांगितले. 60 वर्षांवरील वयोगटाच्या बहुतांश नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरी तर दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. रक्तदाब, शुगर आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे त्यांनी लवकर लसीकरण करणे आवश्यक आहे. आता लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
लसीकरणासाठी जनजागृती करावी
सरपंचांनी ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे सहकार्य घेत लसीकरणासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील, शिक्षक यांचाही जनजागृतीकरता सहभाग घ्यावा. लक्षण दिसल्यास किंवा रुग्णाच्या संपर्कात आल्यास तातडीने चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन आमदार कांबळे यांनी यावेळी केले. कोणालाही लक्षण दिसल्यास तज्ज्ञ
डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मोठे समारंभ टाळावे, गर्दी टाळावी, असे त्यांनी आवाहन केले.