(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे श्वेताची हत्या; महिला पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन
श्वेताच्या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे श्वेताची निर्घृण हत्या झाली. या प्रकणाची वेळीच दखल न घेतल्याने चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आले.
Pune Crime News : पुण्याच्या औंध परिसरात (Pune Crime) लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीचा खून करुन प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हे ठरवून केलेलं हत्याकांड किंवा आत्महत्या आहे, अशी चर्चा सुरु होती. मात्र याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्वेता रानवडे आणि प्रतिक ढमाले अशी दोघांची नावं होती. हत्या होण्याच्या काही दिवस आधी या श्वेताने पुणे पोलिसांना पत्र लिहून अपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटलं होतं. या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे श्वेताची निर्घृण हत्या झाली. या प्रकणाची वेळीच दखल न घेतल्याने चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आले. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.
श्वेताने पोलिसांना तक्रार अर्ज लिहून प्रियकराकडून आपल्याला कशाप्रकारे त्रास दिला जात आहे, याची माहिती दिली होती. मात्र तरीसुद्धा चतु:श्रुंगी पोलिसांनी या पत्राकडे दुर्लक्ष केले आणि त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात या तरुणीची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. जर पोलिसांनी वेळीच तिच्या या तक्रारीची दखल घेतली असती तर तिचा आणि तिच्या प्रियकराचा दोघांचाही जीव वाचला असता. त्यामुळे चतु:श्रुंगी पोलिसांच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
श्वेताने तक्रारीत काय लिहिलं होतं?
श्वेताने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात तिच्या जीवाला धोका असल्याचं नमूद केलं होतं. तिचा प्रियकर प्रतिक ढमालेवर तिने गंभीर आरोप देखील केले होते. तो तिचा छळ करत होता, तिला धमकवण्याचा प्रयत्न करत होता. धमकीनंतर घरात घुसून राडा करेन, असं सांगत होता. त्याचा स्वभाव न पटल्यामुळे श्वेताने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. नकारानंतर परिणाम भोगायला तयार रहा, अशी धमकीही दिली होती. शिवाय तिच्यासोबत राहताना काढलेले फोटो, व्हिडीओंचा तो चुकीचा वापर करु शकतो, त्यामुळे त्याच्यावर योग्यवेळी कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार तिने पोलिसांना दीड महिन्यांपूर्वीच दिली होती. तिच्यावर संकट ओढावणार होतं हे तिला कळलं होतं. मात्र पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखलच घेतली नाही त्यामुळे दोघांचा जीव गेला.
पोलिसांवरच कारवाई
महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली सूळ यांना सोमवारी निलंबित करण्यात आले. तर पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक राजकुमार वाकचौरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तरुणींच्या पुण्यात रोज अनेक तक्रारी पोलिसांत दाखल होतात. त्यामुळे पोलीस या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचं या घटनेतून समोर आलं आहे. त्यामुळे प्रत्येक तक्रारीची पोलिसांनी दखल घेऊन योग्य कारवाई करणं गरजेचं आहे नाहीतर श्वेतासारखे अनेक प्रकरणं घडण्याची दाट शक्यता आहे.