एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चेन्नईहून अकोल्यात मुलगी पाहायला येणं पडलं महागात, भामट्यांनी लावला 17 लाखांना चुना
चेन्नईहून अकोल्यात मुलगी पहायला येणं एका परिवाराला चांगलंच महागात पडलं आहे. त्यांना मुलगी पाहायला बोलावणाऱ्या भामट्यांनी मारहाण करत तब्बल 17 लाख लुटलं आहे.अकोला स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्र फिरवत याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
अकोला : अकोल्यात मुलगी पाहायला येणं चेन्नई येथील जैन कुटूंबियांना चांगलंच महागात पडलं आहे. मुलगी पहायला बोलविणाऱ्या भामट्यांनी या कुटुंबियांना मारहाण करीत त्यांच्याकडील तब्बल 16 लाखांचा ऐवज लुटला आहे. यामध्ये 36 तोळे सोनं, रोख रक्कम आणि महागड्या मोबाईल्सचा समावेश आहे. अकोला स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्र फिरवत याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी लुटमारीतील पावणेबारा लाखांचा ऐवजही जप्त केला आहे. यात एकूण पाच आरोपी असल्याचं पोलीस तपासात निष्पण्ण झालं आहे. याप्रकरणातील राजस्थानचा मध्यस्थी आणि अटकेतील आरोपींच्या संबंधांवरून मुली विकणारी अन् लोकांना फसविणारी एखादी मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. अकोल्यात सध्या या न झालेल्या लग्नाच्या गोष्टीची मोठी चर्चा आहे.
नेमके काय आहे प्रकरण? के. भिमराज जैन हे तामिळनाडूतील चेन्नईचे मोठे कापड व्यापारी आहेत. भिमराज यांचा मुलगा दिलीप लग्नाच्या वयाचा. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्याच्यासाठी वधु संशोधन सुरू होतं. मात्र, मुली मिळत नसल्यानं त्याच्या लग्नाला उशीर होत होता. चेन्नईच्या जैन कुटुंबियांच्या ओळखीत राजस्थानच्या बाडमेर येथील कैलास जैन उर्फ कैलास मानक मल होता. कैलासच्या संपर्कात अकोल्यातील अमरदीप पाटील, अमोल मोरे आणि अभिजीत इंगोले आणि आणखी काही जण होते. यांच्या माध्यमातून अकोल्यातील एका मुलीचा बायोडाटा जैन कुटुंबियांना पाठविला गेला. कैलासच्या आग्रहामुळे जैन कुटुंबीय पाच लोकांसह सोमवारी अकोल्यात पोहोचलेत. यात भिमराज जैन, त्यांची पत्नी, मुलगा दिलीप, हैदराबादला राहणारी मुलगी अन् तिचा लहान मुलगा यांचा अकोल्यात आलेल्यांमध्ये समावेश होता. मंगळवारी मुलगी पहायचं ठरवलं गेलं. मात्र, बायोडाटा पाठविलेल्या मुलीनं लग्नाला नकार दिला. मग कैलासनं या जैन कुटुंबियांना दुसरी मुलगी पहायला जायचे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडील पैसा, सोनं-नाणं पाहून यांना लुटण्याचा 'प्लॅन' कैलास आणि कंपूने रचला. या बहाण्याने त्यांनं एमआयडी भागातील एका निर्जनस्थळी या सर्वांना नेलं. यावेळी त्यानं आधीच अमरदीप पाटील, अमोल मोरे आणि अभिजीत इंगोले आणि आणखी दोघांना बोलावून घेतलं होतं. या सर्वांनी जैन कुटुंबियांना धमकावत, मानेला चाकू लावत त्यांच्या अंगावरील सोनं, खिशातील पैसे आणि महागडे मोबाईल हिसकावून घेतलेत. त्यांना मारहाणही केली. यानंतर त्यांना कुंभारी गावानजिकच्या जंगलात सोडून देण्यात आलं. येथून हे सर्व कुटुंबीय कसेतरी अकोल्यात पोहोचलेत. अकोला पोलिसांनी चोवीस तासांत लावला प्रकरणाचा छडा हे कुटुंब सर्वात आधी रामदासपेठ पोलिसांत पोहोचलं. त्यांच्यासोबत झालेल्या या अनपेक्षित प्रकारानं सर्वच जैन कुटुंबिय पार हादरून गेले होते. रामदासपेठ पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. नंतर या प्रकरणाच्या तपासाची सारी सुत्र अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेनं हातात घेतली. पोलीस अधिक्षक जी. श्रीधर आणि अतिरिक्त पोलीस अधिक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक शैलेंद्र सपकाळ यांनी तपासाची दिशा निश्चित केली. सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वात जयंत सोनटक्के, अश्विन मिश्रा, किशोर सोनोने, वसीम शेख, शक्ती कांबळे आणि सायबर सेलचे प्रशांत संदे आणि गणेश सोनोने यांच्या चमूनं चोवीस तासांत तपासाची सारी सुत्र हलवलीत. पोलीसांनी सिंधी कँप परिसरातील अमरदीप पाटील, अमोल मोरे आणि अभिजीत इंगोले या तिघांना अटक केली आहे. यात आणखी दोन आरोपी पोलीस तपासात निष्पण्ण झाले आहेत. सध्या मास्टरमाईंड कैलास फरार आहे. जैन कुटुंबीय म्हणतायेत, 'थँक्यू!, अकोला पोलीस' या संपूर्ण प्रकरणात सैरभैर झालेल्या चेन्नईच्या जैन कुटुंबियांना अकोला पोलिसांनी मोठा आधार दिला. घाबरलेल्या जैन कुटुंबियांना मानसिक आधार आणि बळही दिलं. ते महाराष्ट्राचे पाहूणे आहेत म्हणून गेल्या दोन दिवसांत त्यांची वास्तूपूस्त करीत काळजीही घेतली. सोबतच आरोपी पकडलेत अन् लूटल्या गेलेल्या ऐवजातील बारा लाखांचा मोठा ऐवजही हस्तगत केला. जैन कुटुंबिय महाराष्ट्र अन् अकोला पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना नि:शब्द झाले आहेत. जैन कुटुंबीय आता अकोला पोलिसांना म्हणत आहेत, थँक्यू!, अकोला पोलीस. लग्नाच्या नावाखाली अकोल्यातून राजस्थानात होते मुलींची विक्री गेल्या काही वर्षांत अकोल्यातून राजस्थान, पंजाब, हरियाणात मुलींची लग्नाच्या नावाखाली विक्री झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यातील काहीच घटनांची पोलीस तक्रार झाली. तर अनेक घटना तशाच दबल्यात. अकोल्यातील काही महिलांसह अनेक दलाल अशा प्रकारातून मुलींच्या विक्रीच्या धंद्यात कार्यरत आहेत. अकोला पोलिसांना या प्रकरणाच्या निमित्तानं या टोळ्यांच्या मुळाशी जाण्याची संधी प्राप्त झाली आहे. पोलिसांनी तपास केला तर अकोल्यातून मुलींच्या विक्रीचं एखादं मोठं आंतरराज्यीय रॅकेट समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलिकडे बोगस मॅरेज ब्युरेच्या नावाखाली फसवणूक आणि लुटण्याचे प्रकार सर्रासपणे पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे 'शूभमंगल सावधान' म्हणताना महाठगांसोबतच बोगस मॅरेज ब्युरोंपासूनही सावधान राहा, हाच धडा या घटनेतून घेता येईल.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
कोल्हापूर
Advertisement