डॉ. तावरेसह तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ, आणखी 7 दिवसांची रिमांड; सरकारी वकिलाचा जबरदस्त युक्तिवाद
पुणे अपघात आणि ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण गुन्ह्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कलम समाविष्ट करण्यात आल्याने संपूर्ण तपास एसीपी दर्जाचे अधिकारी करणार आहेत.
पुणे : शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघातप्रकरणी (Accident) आधी अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह आजोबाला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर, ब्लड अहवालात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरेंसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत आणखी 7 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या तिघांना आज न्यायालयात हजर केले असता, 5 जूनपर्यंत पोलीस (Police) कोठडी देण्यात आली आहे. अपघात व ब्लड फेरफार प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी ससून रुग्णालयातील (Sasoon) डॉक्टर आणि शिपायास 27 जूनला अटक केली होती. त्यानंतर, न्यायालयात हजर केले असता, सुरुवातीला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. आता, त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी 7 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात जबरदस्त युक्तिवाद केल्याचंही दिसून आलं.
पुणे अपघात आणि ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण गुन्ह्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कलम समाविष्ट करण्यात आल्याने संपूर्ण तपास एसीपी दर्जाचे अधिकारी करणार आहेत. डॉ. श्रीहरी हळनोर याने अल्पवयीन मुलाचे रक्त घेतले होते. ज्या सिरींजमध्ये ते घेतले ती सिरिंज कचरा पेटीत न टाकता कुणालातरी दिल्या. आता, त्या सिरींज कुणाला दिल्या, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, रक्त नमुण्यावरील सील जप्त करणार आहेत. आरोपीने एका महिलेचे रक्त घेतले होते. ते कुणाचे याचा तपास पोलिसांना करायचा आहे. तसेच, त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला, त्याचाही तपास करायचा आहे. एकमेकांशी कॉल झाले त्याचा तपास करायचा आहे, याप्रकरणी आणखी काही जण संशयित आहेत, त्यांचा तपास करायचा आहे. त्यामुळे, पुढील तपासासाठी पोलिसांनी कोर्टाकडे आरोपींची कोठडी वाढवून मागितली होती. त्यानंतर, न्यायालयाने आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, रक्त तपासणीसाठी रक्त घेताना मुलाचे रक्त सीसीटीव्ही असलेल्या ठिकाणी घेतले. तर, महिलेचे रक्त CMO च्या खोलीत घेतले, जिथं सीसीटीव्ही नाहीत, अशी माहितीही पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.
तपास अधिकारी काय म्हणाले
आर्थिक देवाण-घेवाणमध्ये बाहेरच्या 2 लोकांचा सहभाग दिसून येत आहे.
संपूर्ण प्रकरणाची साखळी establish करण्यासाठी पाच ते सहा लोकांची चौकशी सुरू आहे.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद
ससूनच्या सीसीटीव्हीमध्ये आणखी काही जणांच्या हलचाली दिसत आहेत, त्यांच्या घराची झडती घेतली आहे
या गुन्ह्यात मुलाच्या वडिलांचा सहभाग दिसून येतो, त्याबाबत तपास करायचा आहे. त्यामुळे, पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.
आरोपीचे काय म्हणाले वकील
सरकारी वकिलांनी आज सांगितलेली कारणे पहिल्या दिवशी सांगितलेल्या कारणांचीच प्रतिमा आहे. डॉ. तावरे यांचा घटनास्थळी कुठेच प्रत्यक्ष सहभाग दिसून येत नाही. फक्त नवीन कलम लावले म्हणून कोठडी देऊ नये. परस्परांत कॉलिंग झाले म्हणून कोठडी मागण्याचे कारण नाही. मालमत्तेची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. मुलाचे वडील यांच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे, समोरासमोर बसवून तपासाची गरज नाही.
डॉ. हळनोरचे वकील
कोठडीची कारणे दिली ती नवीन नाहीत. कलम वाढली म्ह्णून फक्त नवीन स्वरूपात दिली. आरोपींकडून 2.50 लाख हस्तगत केले आहेत. आणखी काही हस्तगत करायचे नाही. त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.
रश्मी शुक्ला पुण्यात
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पुण्यात दाखल झाल्या असून पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी रश्मी शुक्ला स्वतः आढावा घेत आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे त्यांच्यासमवेतच्या या बैठकीला उपस्थित होते. आत्तापर्यंत झालेला तपासाचा आढावा घेण्यासाठी त्यांची बैठक सुरू आहे.