Nagpur Winter : डिसेंबरची थंडी, नागपूरकरांना भरवणार हुडहुडी
विदर्भातील इतर जिल्ह्यातही दोन्ही तापमानात अंशता वाढ झाली आहे. 24 तासात पारा वाढला असला तरी सरासरीपेक्षा तो कमीच आहे. त्यामुळे दिवसा हलकी व रात्री कडाक्याच्या थंडीची जाणीव होत आहे.
Nagpur News : नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस नागपूर (Nagpur) शहरातील तापमान घसरण्यास सुरुवात झाली आहे. सध्या हुडहुडी भरवणारी थंडी सोसणारे नागपूरकर डिसेंबर महिन्यात मात्र चांगलेच गारठणार आहेत. सायंकाळी नागपूरचे आभाळ काहीसे ढगांनी आच्छादले दिसत आहे. त्यामुळे रात्रीच्या तापमानात अंशत: वाढ नोंदवण्यात आली. पारा चढला तरी हवेतील गारवा मात्र कायम आहे. सामान्यतः डिसेंबर महिन्यात रात्रीचा पारा घसरण्याचे सत्र सुरु होते आणि कडाक्याची थंडी वाढते. यावेळी मात्र थंडीचा अधिक जोर राहण्याची स्थिती असून दोन वेळा थंडीची (Cold wave) लाट सहन करावी लागण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
डिसेंबरमध्ये सामान्यत: दिवसाचे कमाल तापमान (Average Maximum Temperature) सरासरी 28.9 अंशांच्या आसपास आणि रात्रीचे किमान तापमान सरासरी 12.9 अंशांवर असते. 2 डिसेंबर 2000 रोजी कमाल तापमान 39.7 अंशांवर गेले होते. गेल्या दशकभरात रात्रीचा पारा सातत्याने 8 अंशांच्या खाली घसरले आहे. यापूर्वी 29 डिसेंबर 2018 रोजी पारा 3.4 अंशांवर गेला होता, जो आतापर्यंतचा सर्वात कमी आहे.
या महिन्यात पावसाचीही शक्यता असते. 1967 साली या महिन्यात तब्बल 165.7 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर 1962 साली 5 डिसेंबर रोजी 24 तासात 61 मिमी पाऊस नोंदवला गेला होता. या काळात उत्तरेचा भाग हिवाळी पावसाने प्रभावित राहत असल्याने थंड वारे मध्य भारताकडे प्रवाहित होत असल्याने थंडीत वाढ होते. हवामान खात्याच्या संकेतस्थळावरील नोंदीप्रमाणे गुरुवारी (1 डिसेंबर) नागपूरचे किमान तापमान 13.6 अंश नोंदवण्यात आले तर कमाल तापमान 29.6 अंश आहे. ढगाळ वातावरणामुळे दोन्ही तापमानात अंशत: वाढ झाली आहे.
विदर्भातील इतर जिल्ह्यातही दोन्ही तापमानात अंशत: वाढ झाली आहे. 24 तासात पारा वाढला असला तरी सरासरीपेक्षा तो कमीच आहे. त्यामुळे दिवसा हलकी आणि रात्री कडाक्याच्या थंडीची जाणीव होत आहे. सध्या आकाश ढगाळ असले तरी पावसाची कुठलीही शक्यता नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पुढचे दोन-तीन दिवस वातावरण असेच राहण्याची शक्यता आहे.
ढाब्यांवर वाढली 'बोन फायर'ची क्रेझ
हिवाळ्याची सुरुवात होताच आता शहराबाहेर असलेल्या सावजी आणि ढाबे संचालकांकडून शेकोटीची (बोनफायर) सोय करण्यात येण्याचे प्रमाण यंदा वाढले आहे. पूर्वी मोजक्याच ठिकाणी ही सुविधा असताना, यावर्षी शहराबाहेरच्या जवळपास सर्वच ठिकाणी 'बोन फायर'ची सुविधा उपलब्ध आहे. अनेक ठिकाणी तर ग्राहक पोहोचल्यावर 'बोन फायर' आहे का? हे विचारुनच बसत असल्याचे ढाबा संचालकांचे म्हणणे आहे.
ही बातमी देखील वाचा