धुळ्यात तलवारींचा खच, गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल होणार? आशिष शेलारांचा प्रश्न
BJP Leader Ashish Shelar PC : 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपचा सांस्कृतिक कार्यक्रम. या सभेत भाजपच्या कार्यकर्त्यांना बूस्टर आणि महाविकास आघाडीला कडकडीत डोस मिळणार.
BJP Leader Ashish Shelar PC : एका तलवारीसाठी राज ठाकरे, मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल होतो. मग राज्यात तलवारींचा खच सापडलाय, आता गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे. तसेच, 1 मेच्या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बूस्टर डोस सभा होणार आहे. या सभेत भाजपच्या कार्यकर्त्यांना बूस्टर आणि महाविकास आघाडीला कडकडीत डोस दिला जाणार असल्याचा टोलाही शेलारांनी लगावला आहे.
भाजप नेते आशिष शेलार बोलताना म्हणाले की, "1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपचा एक सांस्कृतिक कार्यक्रम ठरवला आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच भाजपनं एवढा मोठा सोहळा करायची योजना आखली आहे. हजारो कार्यकर्ते सोमय्या ग्राऊंडवर होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 1 मेच्या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बूस्टर डोस सभा होणार आहे. या सभेत बोलताना भाजपच्या कार्यकर्त्यांना बूस्टर आणि महाविकास आघाडीला कडकडीत डोस दिला जाणार आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "मेट्रोच्या पत्र्याआड लपत दगड मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलखोलमधून आम्ही ज्यांची लक्तरं काढलीत, त्यांचा आढावा घेणारी ही सभा असणार आहे.
"खोटी तलवार घेतली तर मोहित कंबोज यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर राज ठाकरे यांना कुणीतरी खोटी तलवार भेट दिली म्हणून कारवाई करण्यात आली. मग आता राज्यात तलवारीचा खच मिळालाय आणि तो जमा होईपर्यंत पोलिसांना मागोवा लागला नाही. त्यामुळे गृहमंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी का?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, सर्व प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी असे दंग्याचे प्रकार सुरू आहेत का? असा संशय व्यक्त होऊ लागल्याचंही त्यांनी म्हटलंय.
राऊत पेड मदतनिसाच्या जीवावर राजकीय वक्तव्य करतात : आशिष शेलार
संजय राऊत पेड मदतनिसाच्या जीवावर राजकीय वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांना एक पाऊल पुढे आणि एक पाऊल मागे घ्यावं लागतं. त्यामुळेच संजय राऊत यांचे ट्वीट डिलीट झालं, असं म्हणत राऊतांवरही त्यांनी निशाणा साधला आहे.
जाणाऱ्याला एक वाट आणि शोधणाऱ्याला एक वाट : आशिष शेलार
आशिष शेलार बोलताना म्हणाले की, "जाणाऱ्याला एक वाट आणि शोधणाऱ्याला एक वाट. राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याची ऑफर असताना आम्ही नीती नियमात चाललो. माणसाचे आणि पक्षाचे रंग कसे बदलतात, हे राज्यानं पाहिलं आहे. 2014 ला शिवसेनेचा दारुण पराभव झाला होता. आधी वलग्ना करत होते आणि मग हात जोडून आम्हाला घ्या, असं सांगत होते. तुम्ही तिघे एकत्र आलात तरी आम्ही पटकी देऊ आणि राज्य पुढे घेऊन जाऊ."
राजकारणात काहीही होतं : आशिष शेलार
मनसेनं घेतलेल्या भूमिकेवर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, "काही लोक दबक्या आवाजात हे बोलतात की, राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद हवं असल्यानं वेगवेगळे प्रयोग होत आहेत. त्यामुळेच हा प्रयत्न सुरू आहे. अशी दबक्या आवाजात चर्चा आहे, असे मी एका मुलाखतीत बोललो. राजकारणात काहीही होतं, जे काल हिंदुत्ववादी होते, ते आज सेक्युलर झालेत. जे काँग्रेसचे तोंड देखील बघत नव्हते, ते त्यांच्या फोटो समोर झुकताना पाहिलेत." पुढे बोलताना आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही. आता तीन गडी विरुद्ध एक असा सामना आहे, पण सामना आम्ही जिंकू, असं म्हणतानाच मुंबईत भाजप स्वबळावर लढेल, असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. सत्तेत राहून नाराज असणारी पार्टी म्हनजे, काँग्रेस पार्टी. काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांवर नाराज, तर कधी मंत्र्यांवर नाराज, असं काँग्रेसचं चित्र आहे. भुईला भार आणि विजेला भार नियमन एवढंच काम काँग्रेसचं आहे, असंही आशिष शेलार म्हणाले.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात 2017मध्येच युती झाली असती, आशिष शेलारांचा गौप्यस्फोट
गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून राज्यात सर्वाधिक राजकीय चर्चा झाली असेल तर ती शिवसेना आणि भाजपाच्या तुटलेल्या युतीची आणि शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनैसर्गिक वाटणाऱ्या अशा आघाडीची. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये 2017मध्येच युतीसंदर्भात चर्चा झाली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट आशिष शेलार यांनी केला आहे. दैनिक लोकसत्तातर्फे आयोजित दृष्टी आणि कोन कार्यक्रमात बोलताना आशिष शेलार यांनी 2017 साली घडलेल्या घडामोडींविषयी सविस्तर माहिती दिली. भाजपच्या नेतृत्त्वानं शिवसेना आणि राष्ट्रवादीला बरोबर घेऊन तीन पक्षांचं सरकार बनवण्याचाही विचार केला, पण तेव्हा राष्ट्रवादीनं शिवसेनेबरोबर सरकारमध्ये यायला नकार दिल्याचं शेलार म्हणाले.