एक्स्प्लोर
Advertisement
मी ‘असा’ जिंकलो ! MPSC टॉपर भूषण अहिरेची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2016 साली घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा (MPSC) निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकचा भूषण अहिरे हा राज्यात पहिला आला आहे. उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत तब्बल 526 गुण मिळवत त्याने प्रथम क्रमांक पटकावला. अभियांत्रिकी शाखेतून पदवीधर असलेल्या भूषणची उपजिल्हाधिकारी पदाकरता निवड झाली आहे. भूषण अहिरसोबत एबीपी माझाने संवाद साधला :
प्रश्न : भूषण सगळ्यात पहिल्यांदा तुझं खूप खूप अभिनंदन. एमपीएससीच्या परीक्षेत तू महाराष्ट्रातून पहिला आला आहेस. तुझ्या आता काय भावना आहेत?
भूषण अहिरे : सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. मी महाराष्ट्रात पहिला आलो, यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. मागे एक-दोन गुणांमुळे पोस्ट गेली होती. त्यामुळे मला जराशी भीती वाटायची की, यावेळी पुन्हा यश हुलकावणी देते की काय. परंतु महाराष्ट्रात पहिलं येण्याचं स्वप्न मला मनोहर भोळे सरांनी दाखवलं होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी माझे आई-वडील आणि उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या गौरी सावंत मॅडम यांचा प्रचंड प्रमाणात मला मानसिक आधार मिळाला. माझे मित्रमंडळी, नातेवाईक, आमच्या कॉलनीतील शेजारची लोक यांनी मला खूप मदत केली. एक मानसिक आधार ज्याला म्हणता येईल.
अभ्यास ही गोष्ट महत्त्वाचीच असते. आपण अभ्यास सातत्याने करत असतो. पण इतर गोष्टींचं सहकार्यही आवश्यक असतं. बरीच मुलं अभ्यास करुन दोन-तीन वर्षांत फर्स्ट्रेट होतात. हल्ली अनेकांना दिशा समजत नाही. त्यामुळे त्यांना असं वाटतं की, आपण भरकटलोय की काय. परंतु अशा वेळेस योग्य दिशेने जाण्यास जो मानसिक आधार असतो, तो मला या लोकांकडून मिळला.
एबीपी माझा वेब टीम
प्रश्न : मानसिक आधाराचा महत्त्वाचा मुद्दा तू मांडलास. तू अभियंत्रिकीचं शिक्षण घेतलंस. एमपीएससीची तयारी कशी केलीस? एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना काय सल्ला देशील, काय मार्गदर्शन करशील?
भूषण अहिरे : माझ्या अभ्यासाचं वेळापत्रक ठरलेलं असायचं. रोज 10 ते 11 तास अभ्यास चालू असायचा. पूर्व परीक्षेसाठी एक वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न, तर मुख्य परीक्षेसाठी वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न वापरला होता. पूर्व परीक्षेत सी-सॅटवर जास्तीत जास्त फोकस केला होता आणि मुख्य परीक्षेवेळी जीएस हा माझा स्ट्राँग पॉईंट होता. मला माहित होतं की जीएसमध्ये जर चांगला स्कोअर काढला, तर आपण पहिल्या पाचमध्ये येऊ शकतो. याची मला शक्यता वाटत होती.
जसं मागच्यावेळी मला इंटरव्ह्यूला थोडे कमी गुण मिळाले म्हणून माझी क्लास-वनची पोस्ट गेली होती. म्हणजे अगदी एका गुणाने माझी डीवायएसपीची पोस्ट गेली होती. त्यामुळे यावेळेस मी असं ठरवलं होतं की, जीएसचाच एवढा स्कोअर काढून ठेवायचा की, इंटरव्ह्यू आणि मराठी-इंग्रजीला कमी जरी गुण मिळाले, सरासरी जरी गुण आले, तरी आपण महाराष्ट्रात पहिल्या पाच येऊ, असं मी ध्येय ठेवलं होतं.
एबीपी माझा वेब टीम
प्रश्न : नक्कीच. तू जिद्द दाखवलीस आणि ती जिद्द फळाला आली. तू कोणत्या विभागात काम करत होतास आणि त्याचा तुला या परीक्षेत कसा फायदा झाला?
भूषण अहिरे : परीक्षा आणि प्रशासन फार वेगळं नाहीय. जे आपण परीक्षेमध्ये आधी शिकतो, त्याच गोष्टींना पुढे प्रशासनात जाऊन फेस करायच्या असतात. परीक्षा ही केवळ आपली चाचणी असते. त्यामुळे आपला खरा कस प्रशासकीय सेवत लागतो. मला अजून प्रशासकीय सेवेचा फार अनुभव नाही. कारण मागच्या वेळेस जरी माझं सिलेक्शन झालेलं असलं, तरी मी एक वर्षासाठी एक्स्टेंशन घेतलेलं होतं आणि ते एक्स्टेंशन घेऊन मी पूर्णवेळ या पदासाठी अभ्यास केला. त्यामुळेच मी हे यश मिळवू शकलो. डेस्क ऑफिसर हे पद मी जॉईन केलं नव्हतं, जरी मागच्या वेळेस मिळालं असलं तरी.
एबीपी माझा वेब टीम
प्रश्न : यूपीएससी अटेम्प्ट करण्याचा विचार आहे? त्यादृष्टीने पावलं टाकतो आहेस का?
भूषण अहिरे : आता डेप्युटी कलेक्टर म्हणून रुजू होणार आहे. त्यानंतर IPS होण्याचं माझं स्वप्न आहेच. पुन्हा अभ्यास करुन मी त्यासाठीही प्रयत्न करण्याचं ठरवलं आहे.
एबीपी माझा वेब टीम
प्रश्न : प्रशासनाच्या कामकाजावर नेहमीच प्रश्न उठवले जातात. प्रशासन थंड पडलंय, असं म्हटलं जातं. तुझं या संदर्भातलं काय मत आहे? तुला पोस्ट मिळाल्यावर तू समाजासाठी काय काय काम करणार आहेस? तुझ्यासमोर ध्येय काय आहे?
भूषण अहिरे : माझं पदवीचं शिक्षण आयटी क्षेत्रात झालं आहे आणि त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रशासनात जास्तीत जास्त कसा करता येईल, लोकाभिमुख प्रशासन कशा पद्धतीने होईल, आज व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, या सर्व गोष्टींचा प्रशासनात जास्तीत जास्त वापर करुन, सर्वसामान्य जनतेपर्यंत कशाप्रकारे प्रशासन पोहोचवता येईल, याची मी आवर्जून काळजी घेईल. माझं जे इंजिनिअरिंगचं शिक्षण झालेलं आहे, ते मी प्रशासनात आल्यानंतरही वाया जाऊ देणार नाही.
एक खरी गोष्टी आहे, ती म्हणजे प्रशासनाकडून सर्वसामान्य लोकांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. परंतु सद्यस्थिती अशी आहे की, प्रशासकीय कर्मचाऱ्यांची संख्या फार नाही. त्यामुळे त्यांच्यावरही अतिरिक्त कामाचा मोठा बोजा असतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, प्रशासन आणि राजकीय नेतृत्त्व यांच्यामध्ये योग्य पद्धतीने समन्वय मला साधता आला आणि लोकांसाठी खूप चांगली कामं करता आली, तर मी माझं भाग्य समजेन, असं मला तरी वाटतं.
एबीपी माझा वेब टीम
प्रश्न : आधी अभ्यासाचं टेन्शन, मग निकालाची धाकधूक असेल, हे सगळं संपलेलं असताना, आता तू थोडं रिलॅक्स झाल्यासारखं निश्चित वाटत असेल. मग काय प्लॅन सुरु आहेत का या दृष्टीने?
भूषण अहिरे : 1 ऑगस्ट 2017 ला आम्हाला कामावर रुजू व्हायचंय. 5 महिन्यांचा वेळ आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे लग्न करणार आहे. कारण मागच्या दोन वर्षांपासून आई-वडील खूपच मागे लागलेले होते.
गेल्या तीन-चार वर्षांपासून मित्र दुरावले होते. अभ्यासात व्यस्त असल्याने अनेकांना वेळ देणं जमत नव्हतं. प्रत्येकाच्या घरी जाऊन मी भेटणार आहे. मित्र,नातेवाईक असं सगळ्यांना भेटणार आहे. शिवाय, एक छोटीशी टूर, म्हणजे बाहेर कुठेतरी नक्की फिरायला जाईन.
एबीपी माझा वेब टीम
प्रश्न : पहिला नंबर पटकावला आहेस म्हणजे नक्कीच कसून अभ्यास केला असणार तू, पण अभ्यासाच्या काळात कधी चेंज म्हणून नाटक-सिनेमे बघायचास की नाही?
भूषण अहिरे : नाटक-सिनेमे बरीच बघितले आहेत. अभ्यासाचं वेळापत्रक असायचंच. परंतु माहिन्याला किंवा आठवड्याला एक दिवस तरी मी माझ्यासाठी द्यायचो. अभ्यास वगैरे सगळ्या गोष्टी सोडून मी स्वत:साठी द्यायचो. तो दिवस अभ्यासव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी काढायचो.
एबीपी माझा वेब टीम
प्रश्न : लग्न करायचं म्हणतो आहेस. मग टीव्हीवरुन तुझा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर आता लग्नासाठी प्रपोजल यायला लागतील.
भूषण अहिरे : तसं लग्न आता ठरलेलं आहे.
भूषण अहिरेच्या पुढील वाटचालीसाठी एबीपी माझाकडून खूप साऱ्या शुभेच्छा !!
EXCLUSIVE : नाशिक - एमपीएससी टॉपर भूषण अहिरेसोबत खास बातचित
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement