यूपीएससी परीक्षेत निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या पूजा मुळे देशात अकरावी
पूजाने तिसऱ्या प्रयत्नात वयाच्या 26 व्या वर्षी हे यश संपादित केलं आहे. पूजाने कोलंबिया विद्यापीठातून सोशल मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच यूपीएससी 2018 परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. या परीक्षेत पहिल्या पन्नास यशवंतामध्ये महाराष्ट्रातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या पूजा मुळे हिने देखील या परीक्षेत यश मिळवले आहे. पूजा देशात अकरावी आली आहे.
पूजाने तिसऱ्या प्रयत्नात वयाच्या 26 व्या वर्षी हे यश संपादित केलं आहे. पूजाने कोलंबिया विद्यापीठातून सोशल मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. तर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दिल्ली येथून पूर्ण केलं आहे. विशेष म्हणजे वडील ज्ञानेश्वर मुळे निवृत्त झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात पूजाने हे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पूजा देखील प्रशासकीय सेवेत आपलं योगदान देणार आहे.
UPSC Results : महाराष्ट्राची सृष्टी देशमुख देशात पाचवी, कनिष्क कटारिया पहिला
ज्ञानेश्वर मुळे यांनी परराष्ट्र खात्यात सचिव पदावर काम केलं आहे. तसेच वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. त्यांच्या पत्नी साधना शंकर या देखील प्रशासकीय सेवेत कार्यरत असून त्या दिल्लीच्या मुख्य आयकर आयुक्त आहेत.
यूपीएससी परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला आहे. तर सृष्टी देशमुख देशात पाचवी आणि मुलींमध्ये पहिली आली आहे. महाराष्ट्राच्या पाच विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेत पहिल्या 50 जणांमध्ये स्थान मिळालं आहे. सृष्टी देशमुख - पाचवी, तृप्ती धोडमिसे - 16 वी, वैभव गोंदणे - 25 वा, मनिषा आव्हाळे - 33 वी, हेमंत पाटील - 39 वं क्रमांक पटकावला आहे.