Shiv Sena On Elvish Yadav : 'वर्षा'वर एल्विश यादवच्या हस्ते आरती, आता शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया
Elvish Yadav Drugs Case : अंमली पदार्थ प्रकरणी वादात सापडलेला एल्विश यादव प्रकरणी शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया आली आहे. एल्विशने गणेशोत्सवात वर्षा बंगल्यावर आरती केली होती.
सिंधुदुर्ग : नोएडातील एका पार्टीत अंमली पदार्थ आणि सापाचे विष पुरवल्याप्रकरणी आरोप असलेला 'बिग बॉस'चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याच एल्विशच्या हस्ते वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत गणपतीची आरती करण्यात आली होती. विरोधकांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला असताना आता शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde Faction) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. गणेशोत्सवात वर्षा बंगल्यावर येणाऱ्या प्रत्येकाची स्क्रिनिंग करणे शक्य नसल्याचे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले.
यंदाच्या गणेशोत्सवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेक सेलिब्रेटींनी वर्षा बंगल्यावर हजेरी लावली होती. यामध्ये मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा समावेश होता. बिग बॉस विजेता एल्विश यादव याने देखील गणपतीची आरती केली होती. त्यावेळीदेखील विरोधकांनी टीका केली होती. आता, नोएडातील रेव्ह पार्टीवरून एल्विश यादव पुन्हा चर्चेत आला आहे.
दीपक केसरकर यांनी या प्रकरणी टीका करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन गणरायाची आरती करणारे अमली पदार्थांचे सेवन करून येतात. हे अतीहुषार असलेल्या संपादकांना दिसतात. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सर्वसामान्य जनता गणेशत्सवात येतात. त्या प्रत्येकाचं स्क्रिनिंग करण शक्य नाही. वर्षा बंद करून आतमध्ये राहणारे मुख्यमंत्री नसून ते जनतेला भेटणारे मुख्यमंत्री आहेत एवढं जरी राऊतानी समजून घेतलं तरी खूप आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटलेय
आंदोलन करण्यापेक्षा समाज मागास कसा आहे, हे आयोगासमोर येणे गरजेचे...
एका सर्वसामान्य मराठा कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्यांची जी बांधिलकी पूर्ण केली असल्याचे त्यांनी म्हटले. तर कोर्टाने नाकारलेलं मराठा आरक्षण पुन्हा देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सुप्रीम कोर्टाने मराठा समाज हा सुधारलेला आहे असं म्हटलं आहे. मात्र तो मागासलेला आहे हे कोर्टात सिद्ध करावं लागेल. यासाठी मराठा समाजाने आंदोलन करण्यापेक्षा आयोगासमोर मराठ्यांची खरी माहिती अशी येईल हे पाहिलं पाहिजे, असे प्रतिपादनही केसरकर यांनी केले.
मनोज जरांगे पाटील यांची तळमळ मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आहे, तेवढीच तळमळ उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे यांची देखील आहे. जरांगे पाटील यांनी एक कमिटी तयार करून शासनाला मार्गदर्शन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा मराठा नेता छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली.
उद्धव यांच्यावर टीका
राज्याचे शिक्षण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना 'वर्षा' बंद करून आतमध्ये राहणारे मुख्यमंत्री नसून हे जनतेला भेटणारे मुख्यमंत्री आहेत असे म्हटले.
राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, संजय राऊत यांची नौटंकी रोज सकाळी 9 वाजता असते. मारण्याच्या धमक्या देऊन झाल्या, प्रेत पोचवली जाणार हे सांगितल. हे सगळ महाराष्टातील जनता विसरलेली नाही, असेही त्यांनी म्हटले.
गेल्या वर्षभरात या सरकारने जे निर्णय घेतले ते तुम्ही का घेतले नाहीत याचं उत्तर द्या, असं आव्हानही केसरकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला दिले आहे. आपण मंत्रालयात गेलं पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत अशी टीका उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केसरकरांनी केली. पक्षाची विचारधारा ज्या दिवशी सोडली त्या दिवशी लोक सोडून जातात. बाळासाहेबांचा स्वाभिमान जनतेने पाहिला आणि सत्तेपोटी घातलेलं लोटांगण देखील जनतेने पाहिलं अशी टीका केसरकरांनी केली.