(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निवडणूक आयोग आता मोदी-शाहांचा झालाय; संजय राऊतांची जहरी टीका
Sanjay Raut On Narendra Modi : महाराष्ट्राच्या बाबतीत असे निर्णय घेण्यात आले. कारण या दोन्ही नेत्यांचा महाराष्ट्रावर राग असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut On Narendra Modi : मोदी-शाहांनी आज अजित पवारांना हा पक्ष दिला असून, ही लोकशाहीची, निवडणूक आयोगाची शोकांतिका आहे. निवडणूक आयोग (Election Commission) भारतीय निवडणूक आयोग राहिला नसून, आज तो मोदी शाहांचा निवडणूक आयोग झाला असल्याची जहरी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) बाबतीत असे निर्णय घेण्यात आले. कारण या दोन्ही नेत्यांचा महाराष्ट्रावर राग आहे. त्यांना महाराष्ट्रावर सूड घ्यायचा आहे. त्यांना मराठी माणसाचा बदला घ्यायचा असल्याचे आता स्पष्ट दिसत असल्याचे देखील संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलतांना संजय राऊत म्हणाले की, "शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष 100 टक्के मराठी अस्मिता जपणारे पक्ष होते. महाराष्ट्रावर अन्याय विरोधात आवाज उठवणारी हे दोन्ही पक्ष होते. या दोन्ही पक्षाची वाताहत करून त्यांनी दाखवून दिलं आहे की, आम्ही महाराष्ट्राचा सूड घेतला आहे. पण महाराष्ट्राची जनता हा सूद उलटुन लावल्या शिवाय राहणार नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना आणि जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी हे या महाराष्ट्रातील जनतेचं धोरण असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.
भाजपला यांचे परिणाम भोगावे लागतील
एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केलं त्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही. त्यांनी भाजपमध्ये शिरकाव करून घेतला. पण, त्यांनी शिवसेना पक्षावर दावा सांगावा आणि भाजपने त्यांना तो पक्ष त्यांच्या हातात सोपवावा हा वादाचा मुद्दा आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करा. यानंतर लोकांसमोर जा, होय हा माझा पक्ष असून मला मत द्या म्हणून सांगा. तुम्ही अशा चोऱ्यामाऱ्या, दरोडेखोरी, लफंगीगिरी करून पक्ष चोरून, तुम्हाला राजकारण करायचं असेल तर हे तात्पुरतं राजकारण आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पक्ष मिळाल्याने त्यांचं अभिनंदन भाजपचे लोकं करत आहे. पण लक्षात ठेवा याच पद्धतीने उद्या तुमच्याही हातातील तुमचं पक्ष जाऊ शकतो. आज मोदी शाहांची गॅरंटी ही तात्पुरती गॅरंटी आहे. उद्याचा काळ हा अत्यंत भयंकर आहे. आणि भारतीय जनता पक्षाला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: