मोठी बातमी : ट्रम्पेटमुळे लोकसभेत शरद पवारांच्या उमेदवारांचा घात, आता निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, पक्षाची मागणी मान्य!
NCP Sharad Pawar: ट्रम्पेटमुळे लोकसभेत शरद पवारांच्या उमेदवारांचा घात झाला होता त्याबाबत आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे.
मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी या दोन चिन्हावरुन शरद पवार गटाला फटका बसल्याचं बोललं जातं होतं. अनेक ठिकाणी तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस यावरून गोंधळ उडाल्याने शरद पवार गटाला मिळणारी मते वेगळ्याच उमेदवाराला मिळाल्याच्या चर्चा सुरू होत्या. पक्षफुटीनंतर घड्याळ चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेतलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) फक्त तुतारी या चिन्हासह अपक्ष उभे राहिल्याने मतदार संभ्रमित झाले. अनेक जागांवर शरद पवार गटाला मिळणारं लीड कमी झालं. त्यानंतर शरद पवार गटाने याबाबत निवडणूक आयोगासमोर (Election Commission) ट्रम्पेटचा उल्लेख मराठीत तुतारी ऐवजी ट्रम्पेट असाच ठेवावा अशी मागणी केली होती. ती मागणी आता निवडणूक आयोगाने मान्य केल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCPSP) पक्षाची मागणी मान्य केली आहे. लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट (तुतारी) या चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मतं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाऐवजी ट्रम्पेटला (तुतारी) ला मिळाली होती. लोकसभेला ट्रम्पेटचा उल्लेख तुतारी असा करण्यात आला होता. या विरोधात निवडणूक आयोगात पक्षाने दाद मागितल्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने ट्रम्पेटचा उल्लेख मराठीत तुतारी ऐवजी ट्रम्पेट असाच ठेवण्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) ट्रम्पेट आणि तुतारी वाजवणारा माणूस असा चिन्हांचा उल्लेख पाहिला मिळणार आहे. नुकताच या संदर्भातला निवडणूक आयोगात (Election Commission) निर्णय आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बारामतीसह अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवाराला मिळालेलं तुतारी चिन्ह
बारामतीत एका अपक्ष उमेदवाराला निवडणूक आयोगाने (Election Commission) तुतारी चिन्ह दिलं होतं. त्यावर शरद पवार गटाने आक्षेप घेतला होता. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती.
पक्षफुटीनंतर घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव अजित पवारांना मिळालं. त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने 'तुतारी फुंकणारा माणूस' असे निवडणूक चिन्ह दिले होते. मात्र लोकसभा निवडणुकीवेळी अनेक अपक्ष मतदारांना निवडणूक आयोगाने 'ट्रम्पेट'चे चिन्ह दिले. त्याला मराठीत 'तुतारी' असा शब्द दिला त्यावरती शरद पवार गटाने आक्षेप घेतला होता. दोन्ही चिन्हांच्या नावांमध्ये साधर्म्य आहे. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडू शकतो. ट्रम्पेटला पर्यायी मराठी शब्द द्यावा, अशी मागणी करण्यात आलेली होती.
त्यावरती आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय देत ट्रम्पेटचा उल्लेख मराठीत तुतारी ऐवजी ट्रम्पेट असाच ठेवण्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभा निवडणुकीत ट्रम्पेट आणि तुतारी वाजवणारा माणूस असा चिन्हांचा उल्लेख पाहिला मिळणार आहे.