(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiv Sena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घराघरात, दर्शन डिप्लोमेसीनं काय साध्य करणार?
Shiv Sena : शिवसेना पक्षप्रमुख आम्हाला भेटत नाहीत, फोन घेत नाहीत आणि आम्हाला वेळ देत नाहीत, या तक्रारीवरून महाराष्ट्रात मोठं राजकारण घडलं.
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख आम्हाला भेटत नाहीत, फोन घेत नाहीत आणि आम्हाला वेळ देत नाहीत, या तक्रारीवरून महाराष्ट्रात मोठं राजकारण घडलं. एकनाथ शिंदे मोठ्या संख्याबळासह उद्धव ठाकरेंपासून लांब झाले. पण आत हेच एकनाथ शिंदे प्रत्येक जुन्या नवीन शिवसैनिकाला विविध निमित्ताने भेटी गाठी घेऊन जिकडे उद्धव ठाकरें पोहचू शकत नाहीत शिंदे पोहचतात आणि आपण कसे सर्वांसाठी उपलब्ध आहोत हे दाखवून देतात.
राज ठाकरे, मनोहर जोशी, मिलिंद नार्वेकर आणि छोटी मोठी गणपती मंडळं, जिकडे उद्धव ठाकरे पोहचू शकले नाहीत तिकडे शिंदे पोहचणार नाही असं गेल्या काही महिन्यात झालंच नाही. गणपती दर्शनाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावावी असे सर्वांना गाठीभेटी देतायत आणि थेट उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते शिंदे करून दाखवण्याचा प्रयत्न करतायत. गेल्या अनेक वर्षात जे घडलं नाही ते एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या भेटीनं सर्वांनाच चक्रावून टाकलं. शिवसेनेतून बाहेर पडलेले राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावरचेच, पण एकनाथ शिंदेंनी मात्र राज ठाकरेंची भेट घेऊन उद्धव ठाकरे विरोधतली जणू मोळच बांधायचा चंग बांधला आहे असं दिसतंय.
गेली अनेक वर्ष मिलिंद नार्वेकरांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होतं. घर्मवीर आनंद दिघेंपासून एकनाथ शिंदे नार्वेकरांच्या घरी जात आले आहेत. यंदा शिंदे मुख्यमंत्री झाले तरी त्यांनी परंपरा सोडली नाही. ते नार्वेकरांच्या धरी गणपतीला गेले पण त्याचवेळी आदित्य आणि रश्मी ठाकरे मिलिंद नार्वेकरांच्या घरी गेले पण उद्धव ठाकरे मात्र गेले नाहीत. जी रणनीती एकनाथ शिंदे राबवत आहेत तीच आता आदित्य ठाकरे सुद्ध करत आहेत.
एकनाथ शिंदे ठाणे असेल किंवा मुंबई लोकांच्या गर्दीत सहभागी होण्याची संधी जराही सोडत नाहीत. ठाण्यातून बाहेर पडताना चंद्रकांत निकम या वृद्गानं हात दाखवला आणि एकनाथ शिंदेंची गाडी थांबली. निकम यांनी शिंदेंना घरी येण्याची विनंती केली आणि शिंदेही निकमांच्या घरी गेले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा सामन्य माणसांच्या घरी गेल्यानं वातावरण तर नक्कीच बदलणार यांत काही शंकाच नाही.
राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत, जुने क्षत्रू आता मित्र झाले आहेत आणि एकाच कुटुंबातले आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. ठाकरे विरुध्द भाजप, मनसे आणि सेना अशी सध्या परिस्थिती आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या बाजुनं पवार आणि काँग्रेस पाहिजे तशी ठामपणे उभी दिसत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचं प्रयत्न करत आहेत. ठाकरेंना जमलं नाही तर करून दाखवून शिंदे लोकांमध्ये आपण कसं राहू शकतो हे दाखवून देत आहेत.