दसरा मेळाव्याकरता शिंदे गटाकडून अखेर मुंबई महापालिकेत अर्ज, शिवाजी पार्क मैदानासाठी सदा सरवणकरांचा अर्ज
Dasara Melava : स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्क येथेच दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याबाबत महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे अर्ज केला आहे.
मुंबई : शिवसेना आणि दसरा मेळावा ( Shivsena Dasara Melava) असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. मात्र, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या (Dasara 2022) निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. कारण दसरा मेळाव्याकरता शिंदे गटाकडूनही अखेर मुंबई महापालिकेला (BMC) अर्ज दाखल करण्यात आला आहे.
सध्या दसरा मेळाव्यांवरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय, गेली अनेक वर्ष परंपरेनुसार बाळासाहेब ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होत आला आहे. विचारांचं सोनं लुटून शिवसैनिक पक्षाचं काम जोमानं करायचा पण आता शिवसेनेत एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि सर्वच काही चित्र बदलून गेलंय. पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह कोणाकडे जाईल अद्याप सांगता येत नाही त्यात पक्षाच्या कार्यक्रमात देखील विभागण्या होताना दिसत आहे हे सगळं सुरु असाताना स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्क येथेच दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याबाबत महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे अर्ज केला आहे. यापूर्वी शिवसेनेकडून देण्यात आलेल्या अर्जावर मात्र मुंबई महापालिकेनं कोणताही निर्णय घेतलेला नाही.