Manoj Jarange : जरांगे मुंबईकडे तर एकनाथ शिंदे दरे गावाकडे; मराठा आरक्षणाचं वादळ घोंगावत असताना शिंदेंचा गावाकडे दौरा
Eknath Shinde News : मनोज जरांगेंचं भगवं वादळ मुंबईत असताना त्याला तोंड देण्यासाठी शिंदे नसतील. ते साताऱ्यातील मूळ गावी गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी जाणार आहेत.

मुंबई : एकीकडे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघण्याच्या तयारीत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र त्यांच्या मूळगावी जाणार आहेत. एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावी जाणार असून त्या ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापणा करणार असल्याची माहिती आहे.
मनोज जरांगे हे 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्यासाठी बुधवारी, 27 ऑगस्ट रोजी ते अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणार आहेत. त्याचेवळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवासाठी दरे या त्यांच्या मूळ गावी जाणार आहेत.
यंदा मुक्तगिरी बंगल्यावर आणि ठाण्यातील लुईसवाडी इथे गणपतीची प्रतिष्ठापना होणार नाही. मुक्तगिरी हे एकनाथ शिंदे यांचे स्वतःचे शासकीय निवासस्थान नाही. तसेच लूईसवाडी इथे गणपतीला पाच वर्ष पूर्ण झाल्याने त्या ठिकाणी आता गणपतीची स्थापना करण्यात येणार नाही. त्यामुळे शिंदे यंदा दरे गावी पारंपरिक पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना करणार आहेत.
शिंदेंच्या मौनावर अनेक प्रश्न
काही झालं तरी मुंबईत येण्याचा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे. जरांगेंची समजूत काढण्यासाठी फडणवीस सरकारची धावपळ सुरू आहे. जरांगेंनी 28 तारखेला मुंबईत धडक देण्याचा निश्चय केला आहे. जरांगेंचं भगवं वादळ मुंबईत असताना त्याला तोंड देण्यासाठी शिंदे नसतील.
मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं असताना शिंदेंनी आजपर्यंत त्यावर मौन बाळगल्याचं दिसून येतंय. मुख्यमंत्री असताना जरांगेंची आंदोलनं हाताळण्याचा अनुभव असताना शिंदे आता गप्प का आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
फडणवीसांच्या स्वीय सहायकाने घेतली जरांगेंची भेट
मनोज जरांगेंनी अंतरवाली सोडण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दूत तिथे पोहोचले. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळेंनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली. गणेशोत्सवाच्या काळात मोर्चा नको, तो पुढे ढकलण्यात यावा अशी विनंती साबळेंनी जरांगेंना केली. मात्र जरांगेंनी फडणवीसांच्या दूताची ही मागणी धुडकावून लावली. आम्ही मोर्चाची आधीच घोषणा केलीय, तेव्हा सरकारनं का दखल घेतली नाही असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला.
मुंबईत आंदोलनाला परवानगी नाही
मुंबईत गणपती घेऊन धडकणारच, असा निर्धार व्यक्त करणाऱ्या मनोज जरांगेंना मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा झटका बसला आहे. गणपतीच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न महत्त्वाचा असल्यानं, मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करता येणार नाही असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
मुंबईलगतच्या नवी मुंबईमध्ये आंदोलनाला परवानगी देण्याबाबत सरकार विचार करू शकतं असं मत सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं मांडलं. अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवल्या जाऊ शकत नाहीत अशी महत्त्वाची टिपण्णी देखील उच्च न्यायालयानं केली.
























