एकनाथ शिंदे मुळ दरेगावी दाखल, 3 दिवस असणार मुक्काम, अचानक गावी दाखल झाल्यानं चर्चांना उधाण
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) हे महाबळेश्वर तालुक्यातील मूळ गाव दरेगाव या ठिकाणी 3 दिवसांसाठी मुक्कामी आले आहेत.

Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) हे महाबळेश्वर तालुक्यातील मूळ गाव दरेगाव या ठिकाणी 3 दिवसांसाठी मुक्कामी आले आहेत. पाच वाजता मुंबईवरुन ते हेलिकॉप्टरने थेट त्यांचे गाव दरे येथे दाखल झालेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी देखील आहेत. उद्या एका घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने ते दिवसभर गावी असणार आहेत. 18 तारखेला ग्रामदैवत येथे त्यांच्या हस्ते पूजा ठेवण्यात आलेली आहे.
अचानक एकनाथ शिंदे तीन दिवस मुक्कामासाठी दरे गावी आल्याने सध्या राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून ते दरेगावी मुक्कामी असणार आहेत. एकनाथ शिंदे यांचा हा खासगी दौरा असणार आहे. घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने ते तीन दिवस मुक्कामी असणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
दरम्यान, अमरावतीकरांसाठी आजचा (16 एप्रिल 2025) दिवस आनंदायी आणि स्वप्नपूर्ती करणारा होता. गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अमरावती विमानतळाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते. मुंबईतून अमरावतीला जाण्यासाठी हे सर्व नेते एकाच विमानाने गेले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ एकनाथ शिंदे बसले होते. तर अजित पवार यांच्याशेजारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ बसले होते. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना झाले. तिथून ते थेट आपल्या सातारा या दरे गावी दाखल झाले आहेत.
संजय राऊतांच्या टीकेला उदय सामंत यांचं प्रत्युत्तर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही (राज ठाकरे-एकनाथ शिंदे भेट) जाहीरपणे भेटलो होतो. संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या कामाचं प्रमाणपत्र देण्याची गरज नसल्याची टीका मंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्यांच्याकडे असलेले दहा-पंधरा आमदार त्यांनी व्यवस्थित सांभाळावे असा टोसा देखील मंत्री उदय सामंत यांनी लगावला होता. संजय राऊत यांच्यावर टीका करुन आम्हाला त्यांना मोठं करायचं नाही असंही मंत्री उदय सामंत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदेंच्या खात्याचे 3 धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार; कॅबिनेटमध्ये 7 मोठे निर्णय























