इयत्ता 9 ते 12 वीच्या वर्गांसाठी दूरदर्शनवर कार्यक्रम; वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
इयत्ता 9 ते 12 वी वर्गांसाठी आता दूरदर्शनवर कार्यक्रम प्रसारित होणार आहेत. दूरदर्शनकडून ऑक्टोबरपासून इयत्ता 9 ते 12 वीच्या वर्गाच्या कार्यक्रमासाठी वेळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यक्रमाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई : राज्यातील शाळा- कनिष्ठ महाविद्याल कधी सुरु होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसताना राज्यातील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या टप्प्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरु केला जाणार आहे, अशी माहिती विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे. शिवाय, ऑक्टोबरपासून इयत्ता 9 ते 12 चे कार्यक्रम कधी प्रक्षेपित केले जाणार?याबाबत लवकरच वेळापत्रक सुद्धा जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.
15 जूनपासून शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण दिले जात असताना विद्यार्थ्यांना दूरदर्शनद्वारे घराघरांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत होते. त्यासाठी मे-जून महिन्यापासून राज्याच्या शिक्षण विभागाकडून दूरदर्शनकडे वेळ मागण्यात आली होती. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना याबाबत पत्र लिहून दूरदर्शनकडून वेळ मिळावी अशी विनंती केली होती.
याआधी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने विद्या प्राधिकरणाच्या सहकार्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'टिलीमिली' हा कार्यक्रम सुरु केला होता. सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत सहयाद्री वाहिनीवर पहिली ते आठवी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम सुरु केले गेले. मात्र, इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असा कोणताही शैक्षणिक कार्यक्रम नव्हता, त्यामुळे आता या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा मिळणार आहे. केंद्राने इयत्ता नववी ते बारावी शाळा 21 सप्टेंबर शाळा सुरु करण्याबाबत गाईडलाइन्स जाहीर केल्या असताना 21 सप्टेंबरपासून राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार नसल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्यानंतर शाळा सुरु होईपर्यंत या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येणार आहे. पहिल्या टप्यात इयत्ता नववी ते बारावी आणि त्यानंतर टप्याटप्याने इतर वर्गासाठी दूरदर्शनची वेळ घेऊन कार्यक्रम प्रक्षेपित करण्याचे शिक्षण विभागाचे प्रयत्न आहे.
महाराष्ट्रात शाळा सुरु करण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेणार : शिक्षणमंत्री
केंद्र सरकारने राज्यात 21 सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा नियमित सुरु करण्याबाबत नुकतेच निर्देश दिले होते. त्याबाबत एसओपी (स्टण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जाहीर केली. परंतु, महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता 21 सप्टेंबरपासून शाळा सुरु करणं अवघड असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं होतं. याबाबत शिक्षण विभाग आणि संस्थाचालक महामंडळाची बैठक घेण्यात आली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिला होता. म्हणून आता शाळा सुरु करण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं होतं.