ED Summons to Bhavana Gawali : शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचं समन्स, पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
ED Summons to Bhavana Gawali : शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना गवळी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे.
ED Summons to Bhavana Gawali : शिवसेना (Shiv Sena) खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समधून देण्यात आले आहेत. तसेच, चौकशीसाठी हजर न झाल्यास ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता असल्याचीही माहिती मिळत आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील (Mahila Utkarsh Pratishthan) मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना गवळी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे.
यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या पाच संस्थांवर ईडीनं काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. त्याआधी भाजपनं भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीनं भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या होत्या. ईडीच्या या कारवाईवर बोलताना भाजपनं जुलमी सत्र सुरू केलं आहे. माझी आणि माझ्या संस्थांची काय चौकशी करायची ती करा. पण शिवसेना हा अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष आहे. आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही, असं भावना गवळी म्हणाल्या होत्या. माझी चौकशी करताय तर वाशिम जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांची पण चौकशी करा, अशी मागणीही त्यावेळी खासदार भावना गवळी यांनी केली होती.
दरम्यान, भावना गवळी यांच्या वडिलांचे सोबती असलेले शिवसैनिक हरीश सारडाने यांनी भावना गवळींची ईडीला तक्रार केली आहे. त्यानंतर हे प्रकरण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लावून धरलं होतं. एवढंच नाही तर सोमय्यांनी वाशीमला येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यांच्याविरोधात 100 एकर जमीन असलेल्या बालाजी पार्टीकल बोर्डाच्या सहकारी कारखान्याबाबतच्या एकूण खरेदी-विक्री व्यवहाराबाबत तक्रार करण्यात आली होती.
भावना गवळींवर काय आहेत आरोप?
- 1992 ला पणन संचालकांकडे श्री बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखाना मर्यादित पुंडलिकनगर रजिस्टर झाला. ज्याचे अध्यक्ष भावना गवळींचे वडील पुंडलिकराव होते. राष्ट्रीय सहकार निगमने कारखान्याला रुपये 43.35 कोटी निधी दिला. ज्याचे हमीपत्र राज्य शासनाचे होते. 2001 पर्यंत कारखाना सुरु केला नाही, पण मशीन, बिल्डिंग सगळी उभी झाली.
- 2001 ला खासदार भावना गवळी अध्यक्ष असलेल्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानाला शासनाची परवानगी न घेता आणि निविदा न काढता सहकारी कारखान्याची 14 हेक्टर जमीन विकत दिली.
- 2001 ला खासदार भावना गवळी कारखान्याच्या अध्यक्ष झाल्या.
- 2007 मध्ये तत्कालीन पणन संचालक, पणन मंत्री आणि वित्त मंत्री यांनी कारखाना अवसनात काढण्याची परवानगी दिली.
- परवानगी मजेशीर होती असा आरोप, ज्या अध्यक्षानं म्हणजे भावना गवळी यांनी कारखाना बुडवल्याचा आरोप आहे, त्यांनाच LIQUIDATOR नेमलं.
- अव्यवसायक मंडळावर असणारे इतर सदस्य - भावना गवळींच्या आई शालिनीताई आणि त्यांच्याच संस्थेचा सदस्य मदन रामजी काळे आणि नातेवाईक श्यामराव जाधव यांनी कारखाना विकायची परवानगी मागितली. पण प्रस्ताव पाठवताना 22/8/2008 ला वाशीमचे जिल्हा उपनिबंधक यांनी ज्या अटीशर्ती टाकल्या होत्या त्या पाळल्या नाहीत.
- तिसऱ्यांदा जाहिरात काढली, जुलै 2010 ला तालुका स्तराच्या वर्तमानपत्रात. टेंडर मंजूर केलं.
- टेंडर मिळालेल्या कंपनीचं नाव - भावना ऍग्रो प्रॉडक्ट्स अँड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड - अशोक गांडोळे यांचे 90% शेयर्स जे भावना गवळींचे अधिकृत पीए आहेत.
- निविदा मंजूर केलेल्या कंपनीचे पैसे नाहीत, मग शासनाची परवानगी न घेता तत्कालीन पणन संचालक यांनी बँक गॅरेंटीवर कारखाना विकण्याची परवानगी दिली. परत टेंडर काढायला पाहिजे होते, ते ही केले नाही
- 16 ऑगस्ट 2010 ला निविदा न काढता पीए असणाऱ्या गांडोळेला कारखाना विकला. बँक गॅरेंटीची अट होती ज्यात द रिसोड अर्बन कोपराटीव्ह क्रेडिट सोसायटी यांची रुपये 6.84 कोटी बँक गॅरेंटी घेतली.
- ज्या क्रेडिट सोसायटीने हि बँक गॅरेंटी दिली, त्या पत संस्थेच्या अध्यक्षही भावना गवळीच. बँक गॅरेंटी देताना रिसोड अर्बन क्रेडिट सोसायटीने काहीच मॉर्गेज घेतलं नाही.
- हे पैसे शासनाकडे भरण्याची जवाबदारी LIQUIDATOR बोर्डाकडे होती, ते पैसे अजून ही भरलेले नाही. न ते पैशे पतसंस्थेने भरले
- जो सहकारी कारखाना होता तो अशा पद्धतीने पीएशी संगनमत करून गिळंकृत केल्याचा आरोप