ED Raids On Anil Parab : अनिल परबांवर दापोली रिसॉर्ट प्रकरणी कथित घोटाळ्याचे आरोप नेमके काय?
ED Raids On Anil Parab : दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनिल परबांवर कारवाई केल्याचं बोललं जात आहे.
ED Raids On Anil Parab : शिवसेना नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. शिवसेनेतील मोठं नाव म्हणजे, परिवहन मंत्री अनिल परब. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना (Shiv Sena) नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर ईडीनं (ED) धाड टाकली आहे. एवढंच नाहीतर त्यांच्या निकटवर्तींयांवरही ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) ही कारवाई झाली असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच, ईडीनं अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्ट प्रकरणावरुनही कारवाई केल्याचं बोललं जात आहे. पण अनिल परब यांच्याशी संबंधित दापोली रिसॉर्ट प्रकरण नेमकं आहे तरी काय?
दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनिल परबांवर कारवाई केल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उडवून देणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबांवर तोफ डागत हा कथित घोटाळा उघडकीस आणल्याचा दावा केला होता.
अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. "अनिल परब यांच्यावर ताबडतोब फसवणूक करण्यासाठी मंत्रिपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाऊनच्या नियमांना डावलून 2020 मध्ये तीनमजली रिसॉर्ट बांधल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली होती. अनिल परब यांनी 19 जून 2019 रोजी पुण्यात राहणाऱ्या विवान साठे यांच्याकडून दापोली-मुरुड समुद्रकिनाऱ्यावर जागा घेतली होती. 1 कोटींमध्ये ही जागा घेतली. खरेदीखत शेतजमीन म्हणून झालं. सगळी कागदपत्रं शेतजमीन म्हणून असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण सातच दिवसांत अनिल परब यांनी 26 जून 2019ला ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं. जागा अकृषिक असल्याचा दाखला देखील जोडल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. यावेळी आरोप करताना किरीट सोमय्यांनी संबंधित खरेदीखत आणि इतर कागदपत्र देखील पत्रकार परिषदेत दाखवली होती.
"7 मे 2021 रोजी तयार केलेल्या कागदपत्रांत ही जागा अजूनही शेतजमीन आहे. पण आज त्या जागेवर प्रत्यक्षात रिसॉर्ट आहे. कोणतीही परवानगी न घेता, सर्व नियमांची पायमल्ली करून लॉकडाऊनदरम्यान अनिल परब यांनी 10 महिन्यांत रिसॉर्टचं बांधकाम पूर्ण केलं. 10 मे रोजी मी स्वत: दापोलीला रिसॉर्टवर जाऊन हा घोटाळा उघड केला. 11 मे 2021ला अनिल परब यांनी बिनशेती जमिनीसाठीचा 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2021 या काळासाठीचा 4 वर्षांचा टॅक्स तलाठीकडे भरला.", असा दावा किरीट सोमय्यांनी केला होता.
कच्च्या झोपडीसाठी दिलेल्या परवानगीची मुदत उलटून गेल्यानंतर तीन मजली रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा आरोप सोमय्या यांनी परबांवर केला होता. “2015-16 मध्ये या जागेवर कच्ची झोपडी बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. पण त्यात 12 महिन्यांत ते बांधकाम करण्यासंदर्भात नमूद करण्यात आलं होतं. पण त्यांनी ते केलं नाही. 2020 च्या सुरुवातीपर्यंत तिथं कोणतंही बांधकाम नव्हतं. त्यामुळे अनिल परब यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही सोमय्यांनी केली होती.
सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर साई रिसॅार्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे याची खातरजमा करण्याचे आदेश रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारयांनी दिले होते. त्यानंतर सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे तक्रार केली होती.
दापोलीत असलेलं हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानं सांगितलं होतं. तसेच, ते तोडण्याचे आदेशही दिले होते. 90 दिवसांत मालक किंवा प्रशासनानं हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आलं नाही. त्यामुळे या रिसॉर्टचं पाणी आणि विजेचं कनेक्शन ताबडतोब तोडण्यात यावं, असं पत्र भाजप नेते किरीट सोमय्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं होतं.
दोपोली रिसॉर्ट प्रकरणाचं पुणे कनेक्शन काय?
अनिल परबांनी पुण्यातील विभास साठे यांच्याकडून दापोलीतील रिसॉटसाठी जमीन खरेदी केली होती. याच पार्श्वभूमीवर या जमीन व्यवहाराच्या तपासासाठी ईडीचं पथक पुण्यात पोहोचलंय. साठे यांच्याकडून 1 कोटी 10 लाखाला रिसॉर्टसाठी जमीन खरेदी केल्याचा आरोप सोमय्या यांनी परब यांच्यावर केला आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी
राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीनं छापा टाकला आहे. आज सकाळीच ईडीच्या पथकानं अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा मारला आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाली असल्याचं म्हटलं जात आहे. त्याशिवाय, ईडीनं अनिल परब यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असल्याचं वृत्त आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्यावर ईडीनं छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
रिसॉर्टशी संबंध नाही : अनिल परब
या रिसॉर्टशी माझा संबंध नाही. याप्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असल्याचं अनिल परब यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं. किरीट सोमय्यांना माझी माफी मागावी लागेल किंवा शंभर कोटी द्यावे लागतील. मला दिलेल्या नोटीसीला मी उत्तर दिलं आहे. सरकारनं ज्यांच्या नावावर रिसॉर्ट आहे, त्यांना नोटीस दिली आहे, असंही परब यांनी स्पष्ट केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :