Bhavana Gawali : भावना गवळींच्या अडचणीत वाढ? संस्थेतील एका कर्मचाऱ्याची ED कडून चौकशी
ED Action on Bhavana Gawali : भावना गवळी यांच्या संस्थेत काम करणारा एका कर्मचाऱ्याची ED ने चौकशी केली असल्याचं स्पष्ट झालं असून त्यामुळे गवळी यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्याचं दिसून येतंय. त्यामध्ये वाशिमच्या शिवसेनेच्या पाच वेळच्या खासदार भावना गवळी यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर 30 ऑगस्ट रोजी भावना गवळी यांच्या संस्थांवर ईडीनं धाडी टाकल्या होत्या. वाशिम जिल्ह्यातील रिसोड व इतर ठिकाणच्या संस्थांमध्ये झडती घेण्यात आली होती. आता गवळी यांच्या संस्थेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा ईडीने जबाब नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.
ईडीनं खासदार भावना गवळी यांच्या एका संस्थेतील दोन कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते मात्र ते उपस्थित झाले नव्हते. आज मात्र भावना गवळी यांच्या संस्थेत काम करणारा एक कर्मचारी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. फारुक जौहर असं त्याचं नाव असून त्याचा जबाब ईडीने नोंदवला असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे भावना गवळी यांच्या अडचणी वाढणार की कमी होणार हे लवकरच समोर येईल.
खासदार भावना गवळींनी 55 कोटींचा बालाजी पार्टीकल बार्ड कारखाना 25 लाखांत घेतला आहे असा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. यासंदर्भात सोमय्यांनी विविध तपास यंत्रणांना पत्र लिहित तक्रार केली होती. त्यानंतर भावना गवळी यांच्या विविध संस्थांवर ईडीकडून 30 ऑगस्ट रोजी धाडी टाकण्यात आल्या होत्या.
भावना गवळी यांच्यावर ईडीची कारवाई
खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. त्याआधी भाजपनं भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या.
ईडीच्या या कारवाईवर बोलताना भावना गवळी म्हणाल्या होत्या की, "भाजपने जुलमी सत्र सुरू केलं आहे. माझी आणि माझ्या संस्थांची काय चौकशी करायची ती करा. पण शिवसेना या अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष आहे. आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही." माझी चौकशी करताय तर वाशिम जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांची पण चौकशी करा, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :