दसरा मेळाव्यासाठी भगवान गडावर येऊ नका, भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
सर्वांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेतला असून गडावर येऊ नका. घरातच भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन सीमोल्लंघन करा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.
बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातल्या भगवान भक्तिगडावरची दसरा मेळाव्याची परंपरा यंदा ऑनलाईन संपन्न होईल, अशी माहिती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चित्रफितीतून दिली आहे. सर्वांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी चित्रफितीत सांगितलं आहे. तसंच गडावर येऊ नका. घरातच भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन सीमोल्लंघन करा असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
आजपर्यंत आपण संख्येचा, गर्दीचा विक्रम मोडला मात्र यंदा कार्यक्रमाचा उच्चांक स्थापित करू. भक्ती आणि शक्तीची परंपरा यावर्षीही कायम राहणार असून दसरा मेळावा होणार मात्र त्याचे स्वरूप आधुनिक असेल असे स्पष्ट करत गडावर येऊ नका असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. आपला भगवान भक्तीगड यावर्षी पुरता आपल्या गावी घेऊन जा. भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि सीमोल्लंघन करा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. दसरा मेळाव्यात ऑनलाईन मार्गदर्शन करणार असल्याचेही पंकजा मुंडेंनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट ( ता. पाटोदा )येथील भगवान भक्तीगड येथे दसरा मेळाव्याची परंपरा आहे. कोरोना महामारीमुळे यावर्षी मेळावा होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. मात्र आज सकाळी पंकजा मुंडे यांनी एक व्हिडिओ शेअर करत ' भक्ती आणि शक्तीची परंपरा खंडित होऊ देणार नाही, असे स्पष्ट करत दसरा मेळावा होणार मात्र तो आधुनिक असेल अर्थातच ऑनलाईन. मी भगवान भक्ती गडावर जाऊन बाबांचे दर्शन घेणार आणि तेथूनच ऑनलाईन बोलणार असल्याचे पंकजाताईंनी स्पष्ट केले. आपल्या सर्वांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेतला असून गडावर येऊ नका. घरातच भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन सीमोल्लंघन करा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा , वेळापत्रक माझ्या सोशल मीडियावरून सर्वांना कळविले जाईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान ऊसतोड कामगार , मुकादम, वाहतुकदारांचा संप आणि राज्यातील राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने पंकजाताई गडावर काय बोलणार ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.