वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टरची आरोग्य केंद्रातच आत्महत्या, अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टरने आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. डॉ गणेश शेळके असं मृत डॉक्टरांचं नाव आहे.
अहमदनगर : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टरने आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. डॉ गणेश शेळके असं मृत डॉक्टरांचं नाव आहे. आत्महत्येस तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे आत्महत्या केलेल्या डॉ गणेश शेळके यांनी सुसाईड नोटमध्ये लिहीलं आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या करंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. गणेश शेळके हे आरोग्य अधिकारी म्हणून काम करत होते. डॉ शेळके हे गेल्या दीड महिन्यांपासून कोरोना काळात करंजी आरोग्य केंद्रात कार्यरत होते. शेळके यांना गेल्या 3 महिन्यांपासून पगार झालेला नव्हता. त्यातच त्यांना पगार कपातीची धमकी देखील वरिष्ठांकडून मिळत होती. त्यामुळे त्यांनी आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
आत्महत्त्येपूर्वी डॉ. शेळके यांनी सुसाईड नोट लिहिली. या नोटमध्ये आत्महत्त्येस तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान दराडे, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे लिहिले आहे, इतकेच नाही तर पगार वेळेवर नाही, अतिरिक्त भार आणि पगार कपात करण्याची धमकी देत असल्याने आत्महत्या करत असल्याचे डॉ.शेळके यांनी लिहिले आहे. डॉ शेळके यांच्यावर अन्याय झाला असून त्यांना न्याय मिळावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी डॉ. गणेश शेळके यांचे नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डॉ. गणेश शेळके यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून त्याचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.
याप्रकारणी सुसाईड नोट मध्ये उल्लेख असलेल्या वैद्यकीय अधिकारी भगवान दराडे आणि तहसीलदार श्याम वाडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगून कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलाय. मात्र या प्रकरणी पगार झाला नाही असा आरोप डॉक्टरने केला असला तरी यात कोणाचा व्यक्तिगत स्वार्थ नाही, त्यामुळे पोलिस तपास करत असून हे प्रकरण संयमाने घेतले पाहिजे असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.
कोविड काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी क्षमतेपक्षा जास्त काम केलं आले. नातेवाईक कोरोना रुग्णांच्या जवळ येत नसताना आरोग्य कर्मचाऱ्यांनीच रुग्णांची सगळी काळजी घेतली. अशात वेळेवर पगार न देणे आणि पगार कपातीची धमकी दिल्याने डॉ गणेश शेळके यांनी आत्महत्त्या केलीये. आणि त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अधिकाऱ्यांची नावे आल्याने पाथर्डी तालुक्यासह जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.