अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेत अस्वस्थता वाढली, समन्वय समितीसमोर गाऱ्हाणं मांडणार : सूत्र
आमदारांना निधी वाटपात कुणावरही अन्याय केला जाणार नाही. सर्व आमदारांना समान निधीवाटप केल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारण (Maharashtra Politics) आलेल्या अस्थिरतेमुळे रोज वेगवेगळ्या चर्चा होत असतात. अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा होतेय. त्यातच आता अजित पवार मुख्यमंत्री होण्याची चर्चा सुरू झाल्याने शिवसेनेतील अस्वस्थता वाढू लागल्याचं बोललं जातंय. त्यामुळे शिवसेनेचे नाराज आमदार ही बाब समन्वय समितीच्या निदर्शनास आणण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा आहे. दरम्यान, वारंवार नाराजीच्या चर्चा सुरू असल्याने पडद्यामागे काही हालचाली सुरू असल्याचंही बोललंय जातंय.
आमदारांना निधी वाटपात कुणावरही अन्याय केला जाणार नाही. सर्व आमदारांना समान निधीवाटप केल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. तसेच विरोधकांचे आरोप तथ्यहीन असल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदर संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, सोबत आमदार आहेत म्हणून त्यांना निधी देणं याला लूटमार म्हणतात. निधी वाटप हा मोठा घोटाळा आहे. याप्रकरणी आमचे नेते रविंद्र वायकर कोर्टात गेले आहेत.
निधी वाटपाच्या वादाचा दुसरा अंक
मविआच्या काळात अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी शिवसेनेच्या आमदारांना निधी वाटप केलं नसल्याचा आरोप झाला. शिवसेनेच्या बंडानंतर याच आरोपांवरुन शिंदेंच्या शिवसेनेतून अनेकदा अजित पवारांवर आरोपही झाले. पण आता चित्र वेगळं आहे. पूर्वी विरोधात असलेले अजित पवार आता सत्तेत आलेत. फक्त सत्तेतच नाही तर ते राज्याचे उपमुख्यमंत्रीही झाले आणि सत्तेत येताच दहा दिवसात त्यांनी अर्थमंत्रीपदाची धूराही हाती घेतली. ज्या अजित पवारांवर शिवसेनेने आरोपांची माळ लावली त्याच अजित पवारांच्या हातात राज्याच्या तिजोरीची चावी पडली. त्यामुळे, निधी वाटपाच्या वादाचा दुसरा अंक दिसेल अशी चर्चा रंगली आहे.
तब्बल 1500 कोटींची तरतूद
अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदरांवर निधीवर्षाव केला आहे. त्यांनी जवळपास प्रत्येक आमदाराला मतदारसंघातील विकासकामांसाठी 25 कोटी तर त्यातल्याच काही आमदारांना 50 कोटींपर्यंत विकासनिधी मंजूर केलाय. त्यासाठी विधिमंडळात पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे. शिवाय, शिंदे गटाच्या काही आमदारांनाही निधी मंजूर केला आहे. विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये विकास कामांसाठी तब्बल 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातूनच राष्ट्रवादीबरोबरच शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधक मात्र आक्रमक झालेत.
अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी आमदारांवर टीका केली होती.त्यापैकी जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघासाठी मात्र निधी मंजूर झालेला नाही. शिवाय, शरद पवार गटाच्या काही आमदारांनाही निधी मिळालेला नाही. त्यातल्या जयंत पाटलांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी मंजूर करुन अनेकांना धक्का दिला. त्यामुळे निधीवाटपावरुन अधिवेशनाचा दुसरा आठवडा गाजण्याची शक्यता आहे..