Devendra Fadnavis : राज्याच्या खजिन्याची चावी अजितदादांच्या हाती, मात्र माझ्या सहीनेच सर्व कारभार; बार्शीच्या सभेत देवेंद्र फडणवीसांची चौफेर फटकेबाजी
धाराशिव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील या निवडणुकीच्या रिंगणात असून आज बार्शी येथे महायुतीच्या वतीने आयोजित प्रचारार्थ सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौफेर फटकेबाजी केलीय.
Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या खजिन्याची चावी ही अजितदादांच्या (Ajit Pawar) हाती देण्यात आली आहे. मात्र, अजित दादांनी असे सांगितले आहे की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सही केल्यावरच मी हा खजिना उघडणार आहे. त्यामुळं या विकासाकामांची यादी मी आजच मंजूर करत असून जे- जे काम या यादीत सुचवण्यात आले आहे, ते सर्व काम होतील. असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बोलताना व्यक्त केलाय.
धाराशीव लोकसभा (Dharashiv Lok Sabha Constituency) मतदारसंघातील महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana patil) या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे महायुतीच्या वतीने त्यांच्या प्रचारार्थ मोठी ताकद त्याठिकाणी लावली असल्याचे बघायला मिळत आहे. अशातच आज बार्शी, सोलापूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला प्रामुख्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी ते बोलत होते.
मी एक बेरर चेक म्हणून काम करणार - देवेंद्र फडणवीस
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी या मतदारसंघात कश्या पद्धतीने विकास कामे केलीत. काय काय योजना आल्या, याची संपूर्ण यादी वाचून दाखवली आणि ते वाचत असताना त्यांनी या सर्वाचे श्रेय मला दिले. मात्र मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो, या बार्शीच्या विकासकामाचा भागीरथ कोणी असेल, तर ते राजेंद्र राऊत हेच आहेत. सातशे कोटी रुपयांची बार्शी उपसा सिंचन योजना आली, ती केवळ त्यांच्या प्रयत्नांमुळे आली. राजेंद्र राऊत अतिशय हुशार माणूस आहे. त्यांनी मला भगवंताचे दर्शन दिले आणि त्यावेळेस प्रलंबित विकासकामांची एक यादी माझ्या हाती दिली.
माझं त्याच्यावर विशेष प्रेम आहे. कारण जो व्यक्ती कायम 24 तास जनतेचा विचार करतो. जनतेच्या विकासासाठी कायम संघर्ष करतो. तसाच व्यक्ती जनतेला देखील प्रिय असतो. म्हणूनच त्यांनी या मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली आहे. असे असताना त्यांनी आज पुन्हा मला प्रलंबित विकासकामांची मोठी यादी माझ्या हातात दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा मी बेरर चेक असून ही यादी मी आजच मंजूर करत असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ज्यांच्या पाठीशी बार्शी, त्याची सगळीकडे सरशी
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपण एकदिलाने राज्याचा कारभार योग्य पद्धतीने पुढे नेत आहोत. आता राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. तसेच या मतदारसंघात राजेंद्र राऊत यांच्यासोबत तानाजी सावंत यांची देखील ताकद उभी आहे. कारण तानाजी सावंत यांचे शिक्षण हे बार्शीमध्ये झाले आहे आणि ज्यांच्या पाठीशी बार्शी, त्याची सगळीकडे सरशी. त्यामुळे मला विश्वास आहे येथील जनता भरभरून प्रेम महायुती आणि आपल्या उमेदवारांवर दाखवतील, असा विश्वासही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवलाय.
इतर महत्वाच्या बातम्या