Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
विराट सर्वपक्षीय मोर्चामध्ये बोलताना सर्व पक्षीय नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी करतानाच त्यांना बीडचे पालकमंत्रीपद सुद्धा देऊ नये, अशी मागणी एकमुखाने करण्यात आली.
Beed Morcha : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्ये प्रकरणी आज (28 डिसेंबर) बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या विराट सर्वपक्षीय मोर्चामध्ये बोलताना सर्व पक्षीय नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी करतानाच त्यांना बीडचे पालकमंत्रीपद सुद्धा देऊ नये, अशी मागणी एकमुखाने करण्यात आली. बीडमधील दहशतीला मुंडे कारणीभूत असल्याचा आरोप अनेक नेत्यांनी केला. भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडे बंधू भगिनीपवर जोरदार हल्लाबोल केला. मूक मोर्चाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, अभिमन्यू पवार, नरेंद्र पाटील, ज्योती मेटकर आणि दीपक केदार यांनी संबोधित केले. संतोष देशमुख यांची कन्या वैभवीने सुद्धा मोर्चाला संबोधित केले. यावेळी वैभवीने काल ढगाआड गेलेला सूर्य आज दिसतोय, पण माझे वडिल कधीच दिसणार नाही म्हणताच मोर्चातील जनता गहिवरली.
या विराट मूक मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसह सामान्य नागरिक सुद्धा सहभागी झाले. आम्ही न्याय मागण्यासाठी आलो आहोत, आम्हाला न्याय द्यावा अशी एकमुखाने मोर्चातून मागणी करण्यात आली. बीडमधील या विराट मोर्चाला जिल्ह्यातील जनतेचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सरकारवर वाल्मिक कराडवर कारवाईसाठी दबाव वाढल्याची चर्चा रंगली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल 19 दिवस उलटून गेल्यानंतरही प्रमुख आरोपी अजूनही सापडत नसल्याने आणि खंडणीखोर वाल्मिक कराड अजूनही फरार असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जर आरोपी सापडले नाही तर आणि जातीयवादी मंत्र्याला पोसणार असाल, तर दंडूक हाती घ्यावं लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी जर धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद दिल्यास छत्रपती घराणे या जिल्ह्याचे पालकत्व घेईल असे सांगितले.
आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना कारवाई न केल्यास दंडूक हाती घ्यावं लागेल, असा इशारा दिला. जरांगे म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे नेत्यांना विनंती आहे तुम्हीच मुख्यमंत्रीकडे जा. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा. जेवढी नावं तुम्ही सांगाल तेवढी अटक करा. जरांगे म्हणाले की, आमची भाषणे होऊन जातील. संतोष भैय्याच्या मुलीचं तोंड एकदा बघा. त्यांनी साांगितले की, तुमचा नेता (फडणवीस) आमचा दुष्मन नाही. आरोपी सापडणे मोठी गोष्ट नाही, आमच्या मुलांनी कमेंट केली तर अटक केली, पण खुनाचे आरोपी तुम्हाला सापडत नाहीत संतोष दादाची हत्या झाली, परभणीत झालं, धाराशिव मध्ये असच प्रकार घडला आहे. अंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावी लागली. काही मंत्र्यांना राज्यात विध्वंस घडवायचा असला तरी आमची ते होऊ देणार नाही. प्रत्येकाला अटक करा, राज्यपालांची परवानगी घ्या आणि अटक करा, राज्यपाल सुद्धा तुमचेच आहेत, असे ते म्हणाले.
मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, असा थेट हल्लाबोल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. अजितदादा तुमची काम करण्याची पद्धत ही परखडपणाची असेल तर आता तुम्ही करेक्ट कार्यक्रम करा असे संभाजीराजे म्हणाले. मला माहित नाही त्यांचा राजीनामा घेतील की नाही. पण बीडच्या सगळ्या जनतेला मला सांगायचं आहे की, त्यांना जर (धनंजय मुंडे) पालकमंत्रीपद दिलं तर छत्रपती घराणं बीडचं पालकत्व गेणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले. आम्हाला दहशत नाही. दहशत चालत असले तर माझं इथं येणं कर्तव्य असल्याचे संभीजीराजे म्हणाले. बीडचा बिहार करायचा आहे का? असा सवाल देखील संभाजीराजेंनी केला.
धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...
तुम्हाला खरंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यायचा असेल, आणि या बीड जिल्ह्याच्या मातीत तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही सांगा की, राजीनामा फेकून मी पुढील चौकशीसाठी समोर जात आहे. असं का तुम्ही करत नाही? तुम्हाला मंत्रीपद आमचे मुडदे पाडायला हवे आहे का? मुळात याचं नावच कशाला घ्यायचं, हा केवळ एक दलाल आहे. यांच्यावर बोलण्याइतपत हा मोठा नसल्याची घणाघाती टीका खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. हे खंडणीखोर कोण हे बघितलं तर आणि त्यांचे मास्टर माईंड तपासले तर लक्षात येईल की, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका त्यांनी केली.
तर महाराष्ट्रमध्ये आग लागल्याशिवाय राहणार नाही, आव्हाडांचा इशारा
बीडमध्ये वंजारी समाजाच्या अनेकांची हत्या झाली आहे. मी देखील जातीनं वंजारी आहे. पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलं आहे. पुसलं गेलेलं कुंकू कोणी परत आणू देणार आहे का? तरीदेखील आपण राजकारण करतो. या ताईच्या भविष्याचा कोणाला विचार आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. मी शांत बसणार नाही, याविरोधात लढणार असल्याचे आव्हाड म्हणाले. तुम्ही वाल्मिक का म्हणता? हा वाल्मिक नाही वाल्या आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला होता पण इथं वाल्मिकीचा वाल्या झाला असल्याचे आव्हाड म्हणाले. वेळेत कारवाई झाली नाहीतर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नसल्याचे आव्हाड म्हणाले.
पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? धसांचा सवाल
सुरेश धस म्हणाले की, माझा सवाल पंकू ताईंना आहे. छत्रपती संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टला उतरला होता. 12 डिसेंबरला गोपीनाथरावांची जयंती आहे, मान्य पण तुम्ही वाट वाकडी करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? असा सवाल सुरेश धस यांनी केला. ते पुढे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी अवैद्य धंदे बंद केले, पण पंकजा ताई तुम्हाला चांगले लोकं चालत नाहीत. सुरेश धस यांनी सांगितले की पंकूताई तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवे आहेत. पंकू ताई तुम्ही चुकला आहात, तुम्हाला द्यायचं असेल तर उत्तर द्या, अन्यथा नाही दिलं तरी चालेल. त्यांनी पुढे सांगितले की, मंत्रीपद भाड्याने दिलं आहे, असं पंकू ताई म्हणत होत्या, पण मी म्हणतो केवळ पालकमंत्री पद नाही तर कृषीमंत्रीपदही भाड्याने दिलं होतं. धस यांनी पैसे गेले तरच फाईल मंजूर होतं होती. ही आमच्या जिल्ह्याची करूण कहाणी, करून कहाणी म्हणतो करुणा नाही, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. धस यांनी सांगितले की, पहिली बायको आहे ती करुणा, पण त्या मायमाऊलीची अवस्था बघा, असे त्यांनी सांगितले. 1400 हेक्टर एकर जमीन यांनी ढापल्याचा आरोप धस यांनी केला.
तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, आमदार क्षीरसागरांची मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. सभागृहात ज्या पद्धतीने सुरेश अण्णा धस बोलले. अजून पाच मिनिटं बोलले, असते तर सभागृह रडलं असतं. मोर्चात हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि अठरा पगड जातींचे लोक माणूस म्हणून आलेले आहेत. या वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अजून अटक नाही, त्याचा गुन्हा थेट संबंध लागतो तरी त्याचा नावं नाही, अशी टीकाही संदीप क्षीरसागर यांनी केली. वाल्मिक कराडला सारंक्षण धनंजय मुंडेचं असल्याचे बोलले जाते. वाल्मिक कराड अटक झाली पाहिजे. फास्ट ट्रॅकमध्ये केस चालली पाहिजे. जोपर्यंत तपास होतं नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली.
कितीही मोठा आरोपी असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे
कोपर्डीचे ज्या पद्धतीने मोर्चे निघाले, संतोष देशमुख हत्येविरोधात देखील राज्यभरात मोर्चे निघतील. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. वाल्मिक कराड असो किंवा कोणीही असो, कितीही मोठा आरोपी असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे. या मोर्चाची दखल सरकारने घ्यावी, असं अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या