देवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन, बाळासाहेबांच्या वक्तव्यांचा उल्लेख करत शिवसेनेला चिमटे
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 95वी जयंती आहे. यानिमित्ताने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना अभिवादन करत व्हिडीओ ट्वीट केला आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95वी जयंती आहे. यानिमित्तानं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. मात्र हा व्हिडीओ फडणवीसांनी शिवसेनेला चिमटे काढण्यासाठी ट्वीट केलाय का? , असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे की, 'हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे : चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत!' तसेच 'आमचे मार्गदर्शक, हिंदूत्त्वाचे जाज्वल्य शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन !' असं दुसरं ट्वीटही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे : चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत!#BalasahebThackeray #बाळासाहेबठाकरे pic.twitter.com/TPVfnA6sKn
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2021
आमचे मार्गदर्शक, हिंदूत्त्वाचे जाज्वल्य शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन ! pic.twitter.com/UZVGB7NdnA
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2021
दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काही निवडक, वेचक आणि वेधक वक्तव्यांचा देवेंद्र फडणवीसांनी या व्हिडीओमध्ये आवर्जुन समावेश केल्याचं पाहायला मिळत आहे. यातून फडणवीसांनी आपला पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला चिमटा तर काढला नाही ना? , अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ :
बाळासाहेब ठाकरेंची जयंती, पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्तानं त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी 6 वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट येथे होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन होणार आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतराचे पालन या कोविड 19 मार्गदर्शक बाबींचे कृपया योग्यरित्या पालन करावे, असं सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :