Super Speciality Hospital Akola : अकोल्यात सरकारी अनास्थेची 'सूपर स्पेशालिटी', 150 कोटी रूपये खर्चून उभारलेली इमारत पडली धुळखात
अकोल्यात 150 कोटी रूपये खर्च करून 'सूपर स्पेशालिटी' रूग्णालय बांधण्यात आलं आहे. या रूग्णालयाचं बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. परंतु, अद्याप हे रूग्णालय सूरू झालं नाही.
Akola News Update : अकोल्यात 150 कोटी रूपये खर्च करून 'सूपर स्पेशालिटी' रूग्णालय बांधण्यात आलं आहे. या रूग्णालयाचं बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. परंतु, अतिशय भव्य, टोलेजंग आणि देखणी असलेली वास्तू सध्या अकोलेकरांसाठी फक्त शोभेची वास्तूच ठरली आहे. कारण, अद्याप या रूग्णालयासाठी होणाऱ्या नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामूळे 200 बेड्स क्षमतेच्या या रूग्णालयाची इमारत धुळखात पडली आहे. विशेष म्हणजे हे रूग्णालय सुरू करण्यासंदर्भात येथील एखादा अपवाद वगळता कुठल्याच लोकप्रतिनिधीला देणघेणं नाही. लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमूळे प्रशासनही याबाबतीत ढिम्म बसल्याचं पाहायला मिळतं आहे. लोकप्रतिनिधी आणि व्यवस्थेच्या अनास्थेच्या गर्तेत येथील सर्वसामान्य रूग्णांची महागडे उपचार घेतांना चांगलीच ससेहोलपट होत आहे.
चार वर्षात बांधकाम पूर्ण
2014 मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारनं केंद्राच्या मदतीनं राज्यात चार सूपर स्पेशालिटी रूग्णालये उभारण्याची घोषणा केली होती. यात विदर्भ आणि मराठवाड्याला प्रत्येकी दोन रूग्णालये मिळाली होती. यामध्ये विदर्भातील अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होता. तर मराठवाड्यात औरंगाबाद आणि लातूर येथे ही रूग्णालये उभारण्यास मान्यता देण्यात आली होती. 2016 मध्ये चारही ठिकाणी या रूग्णालयांच्या उभारणीच्या कामांना प्रत्यक्ष प्रारंभ झाला. आणि तीनच वर्षांत ही चारही रूग्णालये बांधून तयार झाली. अकोल्याचं सूपर स्पेशालिटी हॉस्पिटलही 2019 मध्ये बांधून तयार झालं. मात्र, तयार झालेली ही इमारत फक्त 'बडं घर, पोकळ वासा' ठरली आहे. कारण इमारत उभारणीनंतर रूग्णालय सुरू करण्यासाठी खरी गरज आहे, ती मनुष्यबळाची. मात्र, सरकार मनुष्यबळ नियुक्तीसाठी कासवगतीनं पावलं उचलत असल्यानं ही रूग्णालये सुरू होऊ शकली नाहीत.
अकोल्यातील सूपर स्पेशालिटी रूग्णालयासाठी 1 हजार 80 लोकांची आवश्यकता असल्याचं तज्ञांचं मत आहे. मात्र, सरकार यातील 750 पदांपर्यंतच मान्यता देण्याच्या तयारीत आहे. अकोल्यात पहिल्या टप्प्यातील 223 पदांच्या भरतीसाठी सरकारकडून प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, ही प्रक्रिया अतिशय धिम्या गतीने सुरू असून ती वेळखाऊ आहे. मनुष्यबळच नसेल तर रूग्णालय सुरू होणार तरी कसं?, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.
नोकर भरतीच नाही
अकोला, यवतमाळ, औरंगाबाद आणि लातूर या चारही ठिकाणच्या सूपर स्पेशालिटी रूग्णालयाच्या इमारती बनून तयार आहेत. मात्र, यापैकी एकही रूग्णालय संपूर्ण क्षमतेनं सुरू झालेलं नाही. यातील औरंगाबादच्या सूपर स्पेशालिटीत काही विभाग सुरू झालेत. मात्र, उर्वरीत अकोला, यवतमाळ आणि लातूरला ही रूग्णालये अद्याप सुरू होऊ शकली नाहीत. नोकरभरतीच होऊ न शकल्यामुळे या रूग्णालयांची गाडी पुढे जाऊ शकली नाही. सध्या राज्य सरकारने या चारही सूपर स्पेशालिटी रूग्णालयांसाठी पहिल्या टप्प्यातील 888 जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये अकोला, यवतमाळ आणि लातूरसाठी प्रत्येकी 223 जागांचा समावेश आहे. तर औरंगाबादमध्ये 219 जागा भरल्या जाणार आहेत. या जागा भरल्यानंतरच ही चारही रूग्णालयं सुरू होऊ शकणार आहेत.
अनेक जिल्ह्यांना लाभ
अकोला हे पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी आरोग्यसेवेच्या दृष्टीनं मध्यवर्ती ठिकाण आहे. अकोल्यात उपचारासाठी अकोल्यासह यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि मराठवाड्यातील जालना व हिंगोली जिल्ह्यातील रूग्ण येतात. याच कारणामूळे अकोला जिल्हा सर्वोपचार रूग्णालयावर आरोग्यसेवेचा मोठा ताण आहे. या सूपर स्पेशालिटी रूग्णालयात नऊ आजारांवरील महागडे उपचार अत्यल्प दरात शक्य होणार आहेत.
रूग्णालय सुरू करण्यासाठी अनेक आंदोलने
कोरोना काळात अकोल्यात परिस्थिती फार गंभीर बनली होती. तेंव्हाही हे रूग्णालय सुरू करण्याची मोठी मागणी लोकांमधून होत होती. हे रूग्णालय सुरू करण्यासाठी अकोल्यात अनेक आंदोलनेही झाली आहेत. ज्यांच्या कार्यकाळात हे रूग्णालय जिल्ह्याला मिळालं ते जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार डॉ. रणजीत पाटील यांनी नुकतंच यासाठी आत्मक्लेष आंदोलन केलं आहे. यासोबतच 'जनसत्याग्रह संघटने'नंही यासाठी अलिकडेच रूग्णालयासमोर 'सेल्फी' आंदोलन केलं होतं. मात्र, या आंदोलनानंतरही हे रूग्णालय कधी सुरू होईल? याचं उत्तर कुणाकडेच नाही. जिल्ह्यातून केंद्रात राज्यमंत्री राहिलेले खासदार संजय धोत्रे, पालकमंत्री बच्चू कडू, विधानसभेचे पाच, विधान परिषदेचे चार आमदार आहेत. मात्र, हे रूग्णालय सुरू करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, याचं गांभीर्य कुणातही दिसून येत नाही.
सूपर स्पेशालिटीत होणार 'हे'उपचार
1) कर्करोग, 2) मुत्रपिंड प्रत्यारोपन (किडनी ट्रांसप्लांट), 3) एंडोक्राइनोलॉजी, 4) कार्डियोलॉजी, 5) सीटीव्हीएस, 6) न्युरोलॉजी, 7) न्युरो सर्जरी, 8) सीटीस्कॅन, 9) एमआरआय, 10) सोनोग्राफी, 11) इको-कार्डिओग्रॅम, 12) 2डी ईको, 13) कलर डॉप्लर, 14) थ्रीडी सोनोग्राफी आणि 15) डिजीटल एक्स-रे.