Ashadi Yatra | आषाढी यात्रेसाठी उद्यापासून पालख्यांचं प्रस्थान; भाजप अजूनही पायी वारीवर ठाम
पंढरपूर येथील आषाढी कार्तिकी यात्रेसाठी गुरुवारी 1 जुलैपासून पालख्यांचं प्रस्थान होत आहे. यंदाही कोरोना संसर्गामुळे पायी वारीवर निर्बंध टाकण्यात आले आहे.

मुंबई : पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी उद्यापासून (गुरुवारी 1 जुलै) पालख्याचं प्रस्थान होणार आहे. मात्र, यंदाही कोरोना संसर्गामुळे यात्रा आणि पालख्यांवर निर्बंध असणार आहेत. त्यानुसार आषाढी एकादशीला मानाच्या 10 पालखी सोहळ्यात येणाऱ्या 400 भाविकांना विठुरायाचे दर्शन मिळणार आहे, असा निर्णय आषाढी यात्रा बैठकीत झाला आहे. तर दुसरीकडे या निर्णयाला भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी विरोध केला आहे.
पंढपूरच्या आषाढी कार्तिकी यात्रेसाठी उद्यापासून पालख्याचं प्रस्थान होणार आहे. उद्या देहू येथील तुकोबांच्या आणि परवा आळंदी येथून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आहे. पण, कोरोना निर्बंधामुळे पालख्यांचा फक्त प्रस्थान सोहळा होईल. त्यांनतर पादुका मंदिरातच विसावतील. आषाढीच्या आधी त्या एसटीने पंढरपूरकडे रवाना होतील, असा निर्णय शासनाने घेतला आहे.
Ashadhi Wari 2021 : पायी वारीच्या परवानगीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
पायी वारी होणार म्हणजे होणारच : आचार्य तुषार भोसले
पालखी एसटीतून नेण्यास भाजपने कडाडून विरोध केला आहे. भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी पायी वारी होणार म्हणजे होणारच, असे आव्हान ठाकरे सरकारला दिले आहे. मायबाप वारकऱ्यांनी शेवटपर्यंत सरकारच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहिली. पण, सत्तेच्या नशेत गुंग झालेल्या सरकारने वारकऱ्यांच्या परंपरेला आणि भावनेला साफ धुडकावलं. यापुढे होणाऱ्या सर्व परिणामांना फक्त आणि फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असतील. सविनय कायदेभंग काय असतो ते इंग्रजांनंतर या जुलमी सरकारला लवकरच दिसेल, अशी टीकाही तुषार भोसले यांनी केली आहे.
आधी शहरात लसीकरण करा मगच आषाढी वारी भरवा; पंढरपूर मधील नागरिकांची मागणी
यंदाही पालख्या बसमधूनच..
- मानाच्या 10 पालखी सोहळ्यांच्या प्रस्थान सोहळ्याबाबत शासनाच्या आदेशात म्हटलं आहे की, देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 तर उर्वरित 8 सोहळ्यांसाठी 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल.
- मानाचे पालखी सोहळे प्रस्थान ठिकाणाहून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरकडे दीड किमी अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायी वारी करण्यात परवानगी देण्यात आली आहे.
- यंदाच्या वर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होईल तप पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- शासकीय महापूजा, विठ्ठलाशी संतांच्या भेटी गेल्यावर्षीप्रमाणेच करण्यात येणार आहे. तर नित्योपचार परंपरेनुसार सुरु ठेवून आषाढी यात्रा कालावधीत भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
- एकादशी दिवशीचा रथोत्सवासाठी रथाऐवजी स्वतंत्र वाहनाने 10 मानकरी आणि मंदिर समितीचे 5 कर्मचारी असे 15 व्यक्ती येतील. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल.
- संताच्या पादुका भेटीदरम्यान मानाच्या पालखी सोहळ्यातील 40 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर वारीसाठीच्या 2 बसमध्ये प्रत्येकी 20 असे 40 वारकऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
