(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dengue Fever : जालन्यात डेंग्यूचे 46 रुग्ण, दोन संशयित रुग्णांचा मृत्यू; आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
Dengue Fever : आतापर्यंत 46 रुग्ण आढळून आले असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
जालना : सध्या जालना जिल्ह्यात पर्जन्यमान कमी असल्यामुळे नागरिकांकडून पाणी साठवण्याच्या प्रमाण वाढले आहे. दरम्यान, या कारणाने डेंग्यू (Dengue) आजाराचे एडिस डास घनता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यात डेंग्यू सदृष्य रूग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. तर, दोन डेंग्यू संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जालना जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग अलर्ट झाले आहे. आतापर्यंत 46 रुग्ण आढळून आले असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
जालना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत जालना जिल्ह्यात शासकीय आणि खाजगी रूग्णालयांमध्ये जानेवारी ते 21 ऑगस्टपर्यंत एकूण 143 संशयीत रूग्णांचे रक्ताचे नमुने शासकीय वैद्याकिय महाविद्यालय आणि रूग्णालय औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यात 24 डेंग्यू लागण झालेले आणि खाजगी रूग्णालयत 22 असे एकूण 46 रूग्ण आढळून आले आहेत. तर दोन डेंग्यूची लागण झालेल्या संशयीत रुग्णांचा मृत्यू झाला आहेत.
डेंग्यू आजाराची कारणे
डेंग्यू हा डासांपासून पसरणारा रोग आहे. साचलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या वाढतात. डेंग्यूचा डास चावल्याने डेंग्यू होतो. जुलै ते ऑक्टोबर हे महिने डेंग्यूच्या अळ्यांच्या प्रजननासाठी अनुकूल असतात. या काळात पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता अधिक असते. अशा साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या वाढू शकतात. डेंग्यूमध्ये अनेक प्रकारची सुरुवातीची लक्षणं दिसू शकतात.
डेंग्यू आजाराची लक्षणे
- 'एडीस एजिप्टाय' डासाच्या संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच-सहा दिवसानंतर डेंग्युची लागण होते.
- डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ) अशा दोन प्रकारे हा आजार फैलावतो.
- डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.
- लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.
- एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, चव आणि भूक नष्ट होणे, मळमळणे आणि उलट्या होतात. डेंगी ताप आजारात रुग्णास 2 ते 7 दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो.
- डोके, सांधे, स्नायु दु:खीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होतो.
- अशक्यतपणा, भूक मंदावते, तोंडाला कोरड पडते ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी आणि उपचार करुन घेणे आवश्यक आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
औरंगाबादेतील आपेगाव तापाच्या आजाराने फणफणले; डेंग्यू सदृश आजाराने विद्यार्थिनीचा मृत्यू