(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील 'चांदणी'चा मृत्यू; मादी बिबटने झुंजीत जीव गमावल्याची शंका!
Nagpur : गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना सफारी पिंजऱ्यात सोडण्यात येते. गेल्या आठवड्यापासून चांदणी रात्र निवाऱ्यात परतली नव्हती. यामुळे कर्मचाऱ्यांकडून शोध घेण्यात येत होता.
Nagpur News : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील (Balasaheb Thackeray Gorewada International Zoological Park) मादी बिबट मृतावस्थेत आढळून आली. चांदणी नावाने ती सर्वपरिचित होती. प्राणीसंग्रहालयातील कर्मचारीसुद्धा तिला या नावाने ओळखायचे. अन्य बिबट्यासोबतच्या संघर्षात तिचा मृत्यू झाला असावा, असा कयास लावला जात आहे.
गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना सफारी पिंजऱ्यात सोडण्यात येते. त्यांच्या आरामासाठी रात्र निवाऱ्याचीही व्यवस्था आहे. गेल्या आठवड्यापासून चांदणी रात्र निवाऱ्यात परतली नव्हती. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून कर्मचाऱ्यांकडून शोध घेण्यात येत होता. मात्र, त्यात यश येत नव्हते. यामुळे विशेष शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास चांदणी मृतावस्थेत आढळून आली.
पिंजऱ्यात अडकला नर बिबट
चांदणीचा शोध लागत नसल्याने परिसरात बिबट पकडण्याचा पिंजरा लावण्यात आला होता. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे या पिंजऱ्यात एक नर बिबट अडकल्याचे दिसले. तो गोरेवाडा जंगलातून सफारी पिंजऱ्यात शिरला असण्याची शक्यता आहे. या बिबट्याला सायंकाळी उशिरा निसर्गमुक्त करण्यात आले.
सायंकाळी उशिरा दहन
चांदणी मृतावस्थेत आढळून आल्यानंतर नियमानुसार शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. मृतदेहाच्या अवस्थेवरुन अन्य बिबट्यासोबतच्या संघर्षात तिचा मृत्यू झाला असण्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. सायंकाळी उशिरा सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडल्यानंतर मृतदहाचे दहनप्रक्रिया पार पाडण्यात आली.
पेंच व्याघ्र प्रकल्पातही झाला होता वाघाचा मृत्यू
पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या (Pench Tiger Project) पवनी बफर क्षेत्रातील सिल्लारी बिटाजवळील तलावात मृतावस्थेत आढळलेल्या वाघाच्या (Tiger) मृत्युचा नुकताच उलगडा झाला होता. घटना उघडकीस आल्यापासून अवघ्या 12 तासांच्या आता चार आरोपींना अटक करण्यात आली होती. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, वाघाला विजेचा करंट देऊन ठार करण्यात आले होते. नंतर त्याचे तुकडे करुन त्यांना मोठे दगड बांधून सिल्लारी बिटाच्या कक्ष क्रमांक 256 मधील कोडू तलावाच्या खोल पाण्यात टाकण्यात आले होते. वनविभागाच्या तपास पथकाने वाघाचे अवयव कापलेली जागाही शोधून काढली आहे. ही घटना उघडकीस आल्यापासून सुमारे 15 ते 20 दिवसांपूर्वीची होती. यामुळे पाण्यात टाकलेले वाघाचे अवयव पूर्णतः सडून गेले होते. तरीही अवयवाचे काही तुकडे पाण्यावर तरंगत होते. हा प्रकार काही गावकऱ्यांना लक्षात आल्यावर गुरुवारी दुपारी वन अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पथकासह तातडीने तलावावर धाव घेऊन पाहणी केली. मात्र तो नक्की वाघच असल्याचे स्पष्ट होत नव्हते. परंतु कापलेल्या अवयवांना मोठे दगड बांधलेले आढळल्यावर संशय बळावला. त्यानंतर तो वाघच असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले होते.
ही बातमी देखील वाचा...