Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अधिकाऱ्यांना तंबी! पहिल्याच जाहिर कार्यक्रमात महायुतीच्या कार्यकर्त्यांनाही कानमंत्र
Ajit Pawar in Gadchiroli : उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी शपथ विधीनंतरच्या पहिल्याच जाहीर कार्यक्रमातून अधिकाऱ्यांना जोरदार तंबी दिली आहे.
Maharashtra News Updates : राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी शपथ विधीनंतरच्या पहिल्याच जाहीर कार्यक्रमातून अधिकाऱ्यांना जोरदार तंबी दिली आहे. गेले काही दिवस सरकार सातत्याने गडचिरोलीकडे लक्ष देत आहे. अधिकाऱ्यांनी गडचिरोलीत पोस्टिंग असताना नागपुरात राहून नोकरी करू नये, त्यांनी मुख्यालयात राहिलं पाहिजे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तीन पक्षांचे महायुतीचं सरकार जलद गतीने जनसामान्यांशी आपला संपर्क स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. गडचिरोलीतील "शासन आपल्या दारी" या कार्यक्रमात असंच चित्र पाहायला मिळालं आहे. अति मागास आणि दुर्गम समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शासनाने आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे.
अजित पवार यांची अधिकाऱ्यांना तंबी
अजित पवार यांनी यावेळी म्हटलं की, ''शपथ घेऊन पहिलाच कार्यक्रम गडचिरोलीत होत आहे, याचा आनंद आहे. मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे. अशा वेळेत केंद्रात आणि राज्यात एकच विचारांचा सरकार असेल तर, विकास तीव्रतेने होतो. गडचिरोली जिल्हा निर्माण होऊन 40 वर्ष पूर्ण झाली आहेत. माझं प्रशासनाला म्हणणं आहे, जेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री गडचिरोलीत येतात, मग मंत्रालयातील सचिवांनी ही इथे आले पाहिजे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गडचिरोलीत पोस्टिंग असताना नागपुरात राहून नोकरी करू नये, त्यांनी मुख्यालयात राहिलं पाहिजे.''
''सरकार जनतेसाठी, जनतेच्या अडचणी कमी व्हाव्यात''
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की, इथे असलेले माझे भाजपचे कार्यकर्ते, माझे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि माझे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते... या सर्वांना माझे म्हणणे आहे की, सर्वांनी कुठेही एकमेकात अंतर न पडू देता एकत्रितरित्या काम करावं. सरकार जनतेसाठी असतं, त्यांच्या अडचणी कमी व्हाव्या हेच शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीचं उद्दिष्ट आहे.
तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा कानमंत्र
आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली राज्यातील सत्ता समीकरणं बदलल्यानंतर हे तिघेही पहिल्यांदाच येत असल्याने राजकीय दृष्टिकोनातूनही या कार्यक्रमाचा एक वेगळंच महत्व आहे. महायुतीने एकत्रित काम करावं असा कानमंत्र अजित पवार यांनी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
महायुतीकडून जनसामान्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न
गडचिरोलीत 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर उपस्थित होते. शासनाच्या विविध योजना अंतर्गत हजारो लाभार्थ्यांना कोट्यवधींचा साहित्य लाभ म्हणून दिला जाणार आहे.