एक्स्प्लोर
Advertisement
दाते पंचांग पाऊसमान भाकित
सोलापूरचे दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांच्याकडून आम्ही यंदाच्या पावसाचं भाकित जाणून घेतलं.
सोलापूर : कसा असेल यंदाचा मान्सून? कोणतं नक्षत्र असेल बळीराजासाठी भाग्यवान? कोणतं वाहन किती पाऊस देणार? पाऊस सरासरी गाठणार की कमी होणार? असे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घर करुन असतात. तसं तर हवामान खातं प्रत्येक वर्षी पावसाचा अंदाज वर्तवत असतं. पण आजही बहुसंख्य शेतकरी पंचागावर विश्वास ठेवतात. पंचांगानुसार पावसाचे अंदाज जाणून घ्यायची आणि त्यानुसार शेतीचं नियोजन करायची पद्धत रुढ आहे. सोलापूरचे दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांच्याकडून आम्ही यंदाच्या पावसाचं भाकित जाणून घेतलं.
पंचांगकर्ते मोहनराव दाते यांच्यानुसार राज्यातल्या बळीराजासाठी एक सुखद वार्ता आहे. यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार असून दिलासादायक पर्जन्यमान असेल असा अंदाज दाते पंचागकर्ते यांनी वर्तवला आहे. दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने पावसाबद्दल अंदाज वर्तवला होता. पंचांगानुसारही समाधानकारक पाउस पडण्याचे शुभसंकेत मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. शेतकऱ्यांसाठी येणारा काळ सुखाचा असेल, असा आशावाद पंचांगकर्ते मोहन दाते यांनी वर्तवला आहे. मृग नक्षत्राची सुरुवात चांगली असून यंदाच्या मोसमाचा शेवटही गोड होईल असं त्याचं भाकित आहे.
सामान्यपणे पावसाची सुरुवात मृग नक्षत्रापासून होते. यंदाही मृग नक्षत्र पावसाची नांदी घालणार आहे. मृग नक्षत्र वेळेवर म्हणजे 8 जूनला दाखल होणार आहे. या नक्षत्राचं वाहन पर्जन्यसूचक असल्याने दिलासादायक पाऊस पडणार आहे. हत्ती, मोर आणि बेडूक हे वाहन असल्याने यंदाचा पाऊस समाधानकार असणार आहे. मृग नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात पावसाला खंड पडण्याची शक्यता आहे.
पण 22 जूनला आर्द्रा नक्षत्र सुरु होईल तेव्हा पुन्हा एकदा वरुणराजा दमदार बरसणार आहे. उन्हाळ्याची दाहकता कमी करुन वसुंधरेला हा पाऊस ओलाचिंब करेल. पुनर्वसू नक्षत्राच्या उत्तरार्धात म्हणजे 15 जुलैनंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस होईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वदूर हा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. पुष्य नक्षत्राची सुरुवात 20 जुलैला सुरुवात होणार आहे. सुरुवातीच्या काळात पुष्याचा पाऊस फारसा नसेल पण शेवटच्या चरणात पुष्य नक्षत्रही दमदार बरसणार आहे.
आश्लेषा नक्षत्र 3 ऑगस्ट पासून सुरु होईल. 15 ऑगस्टनंतर पावसाला ओढ मिळेल. नंतरच्या काळातील मघा आणि पूर्वा ही दोन्ही नक्षत्रे आपल्याला फारसा पाऊस देणार नाहीत. 13 सप्टेंबरपासून उत्तरा नक्षत्रात चांगला पाऊस होईल. गणपतीच्या काळातही चांगलं पर्जन्यमान असेल. नवरात्रात मात्र पावसाचा जोर कमी असेल. पण हस्त नक्षत्र या पावसाची कमतरता भरुन काढेल.
10 ऑक्टोबर पासून चित्रा नक्षत्रात मात्र फार पावसाची अपेक्षा नाही. पण 24 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या स्वाती नक्षत्रात दक्षिणेला जोरदार पाऊस असेल. एकंदरीत यंदाच्या मान्सूनचा विचार केला तर पंचागानुसार सरासरी पाऊस पडेल. त्यानुसार कोणत्या नक्षत्रात कोणती पिके घ्यायची, याचं नियोजन शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. शेतकऱ्यांसाठी यंदाचा पावसाचा मोसम आल्हादायक असेल. हवामान खात्याप्रमाणेच पंचांगाचे अंदाजही खरे ठरत आलेत असा आजपर्यंतचा अनुभव आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement