राज्यभर पावसाचा धुमाकुळ, परभणीच्या लोअर दुधनातून विसर्ग वाढवला, माजलगाव धरणाचेही 11 दारं उघडली, कुठे काय स्थिती?
जलसंपदा विभागाने शनिवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये मिळून 88.99% उपयुक्त पाण्यासाठी जमा झालाय.

Dam Water Storage: मराठवाड्यात आठवडाभरापासून सर्व दूर जोरदार पाऊस झाला आहे. अनेक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीड धाराशिवसह बहुतांश ठिकाणी धरणांचे विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्याने मोठे पडझड झाली असून घरादारांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्याच्या अखेरीस राज्यात 20 सप्टेंबर पर्यंत सरासरी 101 टक्के पावसाची नोंद झाली आहे. राज्यात यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांचे विसर्ग सुरू आहेत.
जलसंपदा विभागाने शनिवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये मिळून 88.99% उपयुक्त पाण्यासाठी जमा झालाय. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी धरणांमध्ये 85.29% पाणी साठा होता. राज्यातील एकूण 2997 धरणांमध्ये आज 86 हजार 79 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाण्यासाठी उपलब्ध आहे.
विभागनिहाय कुठे किती धरणसाठा?
नागपूर - 87.84%
अमरावती - 88.68%
छत्रपती संभाजीनगर - 83.94%
नाशिक - 84.92%
पुणे - 92 . 75 टक्के
कोकण- 93.84 टक्के
लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवला
परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवला असून 13,400 ऐवजी 21 हजार 440 क्यूस एक वेगाने पाणी दुधना नदीत सोडले जात आहे. लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग अचानक वाढवल्यामुळे दुधना नदीवर मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. प्रकल्पातून सकाळी १३४०० क्युसेक्स पाण्याऐवजी २१४४० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे, ज्यामुळे नदीकाठच्या भागात पाणी साचले आहे. सकाळी प्रकल्पाच्या १० दरवाजे उघडण्यात आले होते, तर आता आणखी ६ दरवाजे उघडले आहेत आणि एकूण १६ दरवाजे पाण्यासाठी खुल्या आहेत. या मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या विसर्गामुळे दुधना नदीकाठच्या परिसरात पूर निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जालन्यातील कल्याण मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो
जालना जिल्ह्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली असून, जालना तालुक्यात आठ दिवसापूर्वी कोरडाठाक असलेला कल्याण मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय, विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच या प्रकल्पात एवढ्या मोठ्या संख्येने पाणीसाठा झाला असून एकीकडे शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान होत असलं तरी दुसरीकडे हा मध्यम प्रकल्प भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान असून यामुळे जवळपास पंधरा गावचा पाणी प्रश्न मिटला आहे
माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले
माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणातून सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.माजलगाव धरणाचे 11 वक्री दरवाजे सध्या उघडण्यात आले असून सिंदफणा नदीपात्रात 62000 क्युसेक इतका पाण्याचा मोठा विसर्ग केला जात आहे.दरम्यान सिंदफणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय.धरणातील पाण्याची आवक पाहता निसर्ग वाढवणे अथवा कमी केला जाऊ शकतो अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जळगाव, सातारा धरणसाठ्यातुन विसर्ग
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात काल रात्री पासून सुरू असलेल्या पावसामुळे ,पुन्हा एकदा पूर येऊन हिवरा 8000तर अग्नावती4000 आणि बाहुळा नदी मधून 1500 कुसेक्स पाणी सोडले जात असल्याने नदी काठच्या भागात पूर आल्याचे पाहायला मिळत आहे.नदीकाठच्या गावाना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सातारादुष्काळी खटाव तालुक्यात गेल्या दोन दिवसात तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने येरळा नदी सह ओढे आणि नाले दुथडी भरुन वहात आहेत. नदीवरील येरळवाडी मध्यम प्रकल्पात प्रतिसेकंद 6200 क्यूसेक पाण्याची आवक होवून धरणाच्या सांडव्यावरुन तब्बल 6,170 क्यूसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दुष्काळी भागातील एखाद्या धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे























