Monsoon Update : बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर, 23 जूननंतर पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Monsoon Update : आधीच उशिराने दाखल झालेला पाऊस पुन्हा एकदा लांबण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Weather Forecast : सध्या देशाच्या किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळाचं संकट (Cyclone Biparjoy) आहे. गुजरातला (Gujrat) धडकलेल्या या चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह संपूर्ण देशाच्या हवामानावर होत आहे. दरम्यान, यामुळे देशात काही भागात ऊन तर काही भागात पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, मान्सून पुन्हा एकदा लांबण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता 23 जूननंतर पावसाला पुन्हा सुरुवात होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
चक्रीवादळामुळे अधून-मधून पावसाची हजेरी
सध्या राज्यासह देशात होणारा पाऊस हा चक्रीवादळाचा होणार परिणाम आहे. मान्सून सध्या स्थिरावला असून 23 जूनला महाराष्ट्र आणि मध्य भारतात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, दक्षिण आणि ईशान्य भारतात 18 ते 21 जून दरम्यान पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
पाऊस आणखी रखडण्याची चिन्हं
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. त्यानंतरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता असून त्या पुढील आठवड्यात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळेचक्रीवादळामुळे लांबणीवर गेलेला पाऊस आता आणखी रखडण्याची चिन्हं असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी योग्य काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
मान्सून स्थिरावल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली
मान्सून पुन्हा एकदा लांबल्यामुळे नागरिकांची निराशा झाली असून बळीराजाची चिंतेतही वाढ झाली आहे. राज्यातही अनेक भागात अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे. विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांना अजून पावसाची वाट पाहावी लागणार आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने
यंदा महाराष्ट्रात पाऊस उशिराने दाखल झाला, त्यातच जूनचा पंधरवडा उलटला तरी समानाधनकारक पाऊस झालेला नाही. आता पावसासाठी पुन्हा 23 जूनची वाट पाहावी लागणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने पुढे सरकत आहे. 20 जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर आणि मध्य भारतात सक्रिय परिस्थितीसह पावसाची शक्यता आहे.
शेतकऱ्याच्या डोक्यावर चिंतेचे काळे ढग
सर्वसाधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं आगमन होतं मात्र यावर्षी मान्सूनच्या प्रवासाची गती मात्र थंडावली आहे. निम्मा जून महिना उलटून गेला तरी अद्याप मान्सून सक्रिय नसल्याने शेतकऱ्याच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. जून महिन्यामध्ये एकदा पावसाचा खंड झाला की संपूर्ण खरीप हंगामावर वाईट परिणाम होतो. मान्सून लांबल्याने शेतकऱ्याच्या डोक्यावर चिंतेचे काळे ढग आता अधिक गडद होऊ लागले आहेत.