(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जेजुरीत 10 ते 12 मार्चपर्यंत जमावबंदी; महाशिवरात्रीला खंडोबा मंदिरात दर्शनास मनाई
महाशिवरात्री निमित्तानं जेजुरी गडावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असल्याचं चित्र लक्षात घेता घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय
जेजुरी : देशात आणि राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गानं डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर आता पुन्हा एकदा अनेक ठिकाणी निर्बंधाची काही कठोर पावलं उचलण्यात येत आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात नव्यानं कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा सातत्याने वाढत आहे. ज्यामुळे आता अनेक ठिकाणी पुन्हा एकदा जमावबंदीचे नियम लागू करण्यात आले आहेत.
यंदाच्या वर्षी महाशिवरात्री निमित्तानं जेजुरी गडावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असल्याचं चित्र लक्षात घेता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी टाळण्यासाठी बुधवारपासून, म्हणजेच 10 तारखेपासून 12 तारखेपर्यंत या भागात 144 कलम म्हणजेच जमाव बंदी लागू करण्यात आली आहे.
सोन्याची जेजुरी द्राक्षानं मढली, पहा खंडेरायांच्या आरासचे आकर्षक फोटो
जमाबंदीचा कायदा तोडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसंच खंडेरायाच्या मंदिरावर पाताळ लोक पृथ्वी आणि अवकाशातील लिंगाचे दर्शनसाठी खंडोबा मंदिरावर भाविकांस सक्त बंदी करण्यात आली आहे. जेजुरी बाहेरून येणाऱ्यांसाठीही हेच नियम लागू असणार आहेत. या परिसरात असणारे हॉटेल, लॉज मालकांनाही मुक्कामी बुकिंग न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतकंच नव्हे, तर जेजुरी आणि पंचक्रोशीत सार्वजनिक कार्यक्रम मिरवणुकीवर देखील बंदी असणार आहे.