Cruise Drug Case : किरण गोसावी पुन्हा पसार... उत्तर प्रदेशमध्येही दिला पुणे पोलिसांना गुंगारा
क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drug Case) प्रकरणात चर्चेत आलेला आणि स्वत:ला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचं सांगणाऱ्या किरण गोसावीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या दोन टीम उत्तर प्रदेशला रवाना झाल्या आहेत.
मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drug Case) प्रकरणात वादग्रस्त असलेल्या किरण गोसावीने (Kiran Gosavi) पुणे पोलिसांना उत्तर प्रदेशमध्येही गुंगारा दिला असल्याचं स्पष्ट झालंय. पुणे पोलिसांच्या दोन पथकांकडून सध्या किरण गोसावीचा उत्तर प्रदेशमध्ये तपास सुरु आहे. गोसावीचं शेवटचं लोकेशन यूपीतल्या फत्तेपूरमध्ये असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
किरण गोसावी सध्या उत्तर प्रदेशमध्ये असून तो सातत्याने त्याचं लोकेशन बदलतोय. आज दुपारी साडे बाराच्या दरम्यान त्याचं शेवटचं लोकेशन हे फत्तेपूर असल्याची माहिती आहे.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात किरण गोसावीने आर्यन खानला सोडवायच्या बदल्यात शाहरूख खानकडून 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्याचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल याने केला आहे. तसेच किरण गोसावीवर पुण्यामध्ये गुन्हे नोंद असून त्या प्रकरणी पुणे पोलीस त्याच्या शोधात आहेत. पुणे पोलिसांच्या दोन टीम लखनौला गेल्या आहेत.
गळ्यात सोन्याच्या माळा, हातात पिस्तुल आणि एनसीबीचा अधिकारीच असल्याच्या अविर्भावात वावरणाऱ्या किरण गोसावीने उत्तर प्रदेश पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याची तयारी दर्शवली होती. पण शरणागतीसाठी लखनौला गेलेल्या किरण गोसावीला ताब्यात घेण्यास स्थानिक पोलिसांनी नकार दिला. तर गोसावीला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलीस लखनौला पोहोचले. पण गोसावी तिथूनही पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलला खोटं ठरवण्याचा प्लॅन एका व्हॉट्सॅपच चॅटमुळे उघडकीस आला आहे. हे चॅट आहे खुद्द प्रभाकर साईलचं आहे. यात प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांच्यात 2 ऑक्टोबर रोजी कॉर्डिलिया क्रूझवर झालेल्या पार्टी वेळी झालेलं व्हॉट्सॅपवरचं संभाषण समोर आलं आहे. त्यात कारवाईवेळी क्रूझच्या बाहेर उभ्या असलेल्या प्रभाकर साईल यांना किरण गोसावीने रेकी करण्यासाठी उभं केल्याचं समोर येतंय.
या चॅटमध्ये काही मुलींचे आणि मुलांचे फोटोही गोसावीने साईलला पाठवले होते. यातील कोणी दिसलं तर त्याची माहिती गोसावीला पाठवणे हेच प्रभाकर साईलचं काम होतं. पण त्यापेक्षा आणखी एक महत्त्वाचं चॅट समोर आलंय. त्यात किरण गोसावीने प्रभाकर साईलला हाजी अलीला जाण्यासाठी सांगितल्याचा उल्लेख आहे. या चॅटवरून प्रभाकर साईलच खोटारडा आहे हा गोसावीचा दावा त्याला गोत्यात आणणारा ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या :