(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccine | लसीकरण केंद्रांवर आजही शुकशुकाट, लसीकरणाचं लक्ष्य अपूर्ण का राहतंय?
देशात आणि राज्यात कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccine) कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली असली तरी आता त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत आहे. लसीबाबत असणारी साशंकता आणि कोवॅक्सिन लसीबाबत निर्माण झालेले संभ्रम हे या लसीकरणाच्या कार्यक्रमाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याच एक कारण सांगितलं जातं.
मुंबई: देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. परंतु राज्यात लसीकरणाला फारसा प्रतिसाद दिसत नाही. आजही अनेक लसीकरण केंद्रांवर शुकशकाट पाहायला मिळत आहे. लसीकरण केंद्रातील वेटिंग रुम आणि ऑब्जर्वेशन रुममधील खुर्च्या रिकाम्याच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारीच लस घ्यायला घाबरले तर सामान्यांनी काय करायचं असा प्रश्न विचारला जात आहे.
दररोज चार हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य असलेल्या मुंबईत केवळ 1597 जणांनाच लस देण्यात आली. म्हणजेच केवळ 50 टक्केच लसीकरण पूर्ण झालं. तर राज्यातही 52.68 टक्के लसीकरण झालं आहे.
राज्यात शनिवारी (16 जानेवारी) 34 जिल्हे आणि 27 महापालिका क्षेत्रामध्ये लसीकरणाचे सत्र सुरु झाले असून कोविन पोर्टलवर 17 हजार 762 वॅक्सिनेटर्स आणि 7 लाख 85 हजार 927 आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात काल (19 जानेवारी) सायंकाळी सातपर्यंत 14 हजार 883 कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण झालं.
Corona Vaccine | कोविड-19 लसीकरण ट्रॅकर लॉन्च, आता लसीकरणाचं रिअल टाईम अपडेट पाहता येणार!
लसीकरणाचं लक्ष्य अपूर्ण का राहत आहे? - थोडी वाट पाहू मग लस घेऊ ही मानसिकता लोकांमध्ये पसरत आहे. लसीबाबत असणारी साशंकता आणि कोवॅक्सिन लसीबाबत निर्माण झालेले संभ्रम हेही कारण त्यामागे आहे.
- अनेकांच्या मनात या लसीबाबत भिती आहे. लस घेतल्यानंतर येणाऱ्या सौम्य प्रकारच्या रिअॅक्शनचा धसका अनेकांनी घेतलाय.
- पहिल्या दिवशीच कोविन अॅपमध्ये तांत्रिक अडथळे आल्याचं पहायला मिळालं. अनेकांना मेसेजेस गेलेच नाहीत. त्यामुळे आपलं लसीकरण आहे हेच लोकांना समजलं नाही. परिणामी पहिल्याच दिवशी तांत्रिक अडथळ्यांमुळे ब्रेक लागला.
- दोन दिवसाच्या स्थगितीनंतर कोविन अॅपमधील अडथळे दूर केले. मात्र, अजूनही अनेकांना मेसेजेस रात्री उशिरा प्राप्त होतात आणि सकाळी लवकर लसीकरणाची वेळ असते अशी परिस्थिती आहे.
- आरोग्य कर्मचारी हे शिफ्टमध्ये काम करतात. लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यासाठी वेळ देणं हे अनेकांना प्रत्यक्षात शक्य होत नाही.
- केंद्र सरकारच्या नव्या सूचनांनुसार मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार या चारच दिवशी लसीकरण होते. वर्किंग डेज असल्यानेही आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी वेळ काढणं शक्य होत नाही.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 ते 20 दिवसांत 1 लाख 25 हजार लोकांना लस टोचण्याचं टार्गेट आहे. लसीच्या पहिल्या डोस नंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागेल. मात्र लसीकरणाचं वेळापत्रक पहिल्याच टप्प्यात कोलमडलं तर पुढचा सगळा कार्यक्रम विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
Corona Vaccine Drive | आसाममध्ये कोविशील्ड लसीचे 1000 डोस गोठलेल्या अवस्थेत सापडले, चौकशीचे आदेश