Lockdown | तुमचे लॉकडाऊन, आमचे मात्र मरण; हातावर पोट असणाऱ्यांची व्यथा
तब्बल वर्षानंतर सर्वकाही सुरळीत होत आहे असे वाटत असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले अन अनेक जिल्ह्यात परत संचारबंदी, लॉकडाऊन लागले आहे.
Lockdown : कोरोनाचा संसर्ग सुरु झाला अन् अख्खा देश लॉकडाऊनच्या दरीत ओढला गेला. या लॉकडाऊनचा फटका सर्वानाच बसला, व्यवसाय ठप्प झाले, लाखो बेरोजगार झाले. मात्र रुग्णसंख्या काही कमी झाली नाही. तब्बल वर्षानंतर सर्वकाही सुरळीत होत आहे असे वाटत असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले अन अनेक जिल्ह्यात परत संचारबंदी, लॉकडाऊन लागले आहे.
"तुमचे लॉकडाऊन होते मरण मात्र आमचे" असे उद्विग्न वाक्य हातावर पोट असलेल्या नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे. सर्वत्र लॉकडाऊनला विरोध होतोय. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी खरंच लॉकडाऊन हाच पर्याय आहे का, याचा विचार आता व्हायला हवा.
डॉक्टरांनी आता रुग्णाच्या मागे फिरायचं का? गृह विलगीकरणाच्या नव्या नियमावरुन डॉक्टर संतप्त
मागच्या वर्षी २३ मार्चला देशात लॉकडाऊन जाहीर झाला. यानंतर अनलॉक १ ते ५ आणि मिशन बिगेन अगेनमध्ये हळूहळू सर्व काही पूर्वपदावर येत होते मात्र पुन्हा मार्च महिन्यातच महाराष्ट्रातील तब्बल ९ जिल्ह्यात देशातील कोरोनच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आणि रुग्णसंख्येबरोबरच, रुग्णांची मृत्यू संख्या वाढली. त्यामुळे औंरगाबाद, बीडमध्ये लॉकडाऊन, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, जालना आदी शहरांत संचारबंदी जाहीर करण्यात आली. मात्र हे लॉकडाऊन आणि संचारबंदी हि अन्यायकारक असुन तुम्ही कोरोनाचे निर्बंध कडक करा मात्र शहर बंद करून नका अशी मागणी सर्वच ठिकाणी व्यापाऱ्यांनी केली. परभणी, सेलूतील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटुन आपली व्यथा मांडली, बीड मध्येही अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. मागणी वाढल्याने स्टील उद्योगाला सोन्याचे दिवस आले,12 वर्षानंतर यंदा बांधकामासाठी लागणाऱ्या सळयांचा भाव 50 हजार क्विंटल वर गेला पण आता लगेच लॉकडाऊन लागले तर 50 हजार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार असलेल्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल, अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या उद्योगात करोडो रुपयांची उलाढाल ठप्प पडली तर ही उद्योग बंद करण्याची वेळ उद्योजकांवर येईल अशी भीती त्यांना वाटतेय.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करून नोकरी करणाऱ्या परभणीच्या गणेश निर्मळने नोकरी सोडुन स्वतःच हॉटेल व्यावसायिक व्हायचे ठरवले. बँकेकडून २८ लाखांचे कर्ज काढुन फेब्रुवारी २०२० ला जिजाऊ रेस्टारेंट सुरु केले. अल्पावधीतच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला मात्र मागच्या वर्षीच्या बंद मुळे त्याचा व्यवसाय ठप्प झाला. बँकेचे हफ्ते, भाडं, २५ कामगारांना सांभाळायचे कसे, हा प्रश्न पडला. तोच पुन्हा परभणीत संचारबंदी आहे त्यामुळे नेमकं काय करावं हे त्याला कळेना झाले आहे.
सखाराम रनेर यांनी कर्ज काढुन आपल्या टेलरिंग व्यवसायाला कपडा व्यवसायाची जोड दिली मात्र लॉकडाऊनमुळे कपडे घेणं, शिवणकाम कमी झालं. त्यामुळे प्रचंड नुकसान रनेर यांना सोसावे लागले आता आपला प्रपंच चालवणे कठीण झाल्याने कामगार आणि हफ्ते फेडायचे कसे हा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन, संचारबंदीचा खेळ थांबवुन आरोग्य यंत्रणेवर भर देत निर्बंध कडक करून त्याची अंमलबजावणी केली पहिले असं यांना वाटते.
लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने पुणेकरांच्या पोटात गोळा आला. मात्र लॉकडाऊनपेक्षा आपण नियम पाळू अशी मानसिकता पुणेकरांची झाली. तिकडे विदर्भवासियांना आपला आर्थिक गाडा विस्कटू नये असं वाटतंय. जरी रुग्णसंख्या वाढली तरी ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट वर भर द्यावा अशी मागणी विदर्भवासी करत आहेत. मराठवाड्यातील सर्वच उद्योजकांनी या लॉकडाऊनला प्रखर विरोध केला, तर मुंबईतील हॉटेल आणि व्यापारी संघटनेनेही कुठल्याही परिस्थितीत बंद नकोच अशी मागणी केली.
दरम्यान, मागच्या वर्षभराच्या काळात आपली आरोग्य व्यवस्था, प्रशासकीय यंत्रणा कोरोनाचा संसर्ग कमी करण्याबाबत नेमकं काय शिकली हाच संशोधनाचा विषय आहे. अजुनही अनेक कोविड केअर सेंटर मध्ये ऑक्सिजन नाही, सुविधा नाहीत, तपासण्या योग्य पद्धतीने होत नाहीत त्यामुळे उपचाराचे तर विचारानेच नको त्यामुळे रुग्ण वाढले की करा शहर बंद, लावा निर्बंध. तुमचं आमचं ठीक आहे हो, मात्र ज्याचं हातावर पोट आहे अशांचा विचार सरकार केव्हा करणार आहे? त्यामुळे या लॉकडाऊन आणि संचारबंदीचा विचार गांभीर्याने सरकारने करायला हवा.