Anil Deshmukh : कापसाला प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांचा दर द्या, अनिल देशमुखांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी कापसाच्या दरासंदर्भात (Cotton Price) केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Minister Piyush Goyal) यांना पत्र लिहलं आहे.
Anil Deshmukh : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी कापसाच्या दरासंदर्भात (Cotton Price) केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Minister Piyush Goyal) यांना पत्र लिहलं आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांचा दर देण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे. सद्यस्थितीत शासनाने प्रति क्विंटल 6 हजार 380 असा दर निश्चित केला आहे. हा दर खूप कमी असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.
सरकारनं जाहीर केलेली MSP शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यातून शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन कापसाच्या दरात वाढ करावी अशी मागणी, अनिल देशमुख यांनी पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. कापसाच्या दरात घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. कापसाच्या दरात वाढ होण्याची शेतकरी प्रतिक्षा करत आहेत.
Cotton Price : सध्या महाराष्ट्रासह पंजाबमध्ये कापसाच्या दरात घसरण
सध्या महाराष्ट्रासह (Maharashtra) पंजाबमध्ये कापसाच्या दरात (Cotton Prices) सातत्यानं घसरण होत आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळं काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अभ्यासकांच्या माहितीनुसार कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ झाली होती. यावर्षी देखील मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ होईल अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
Cotton : कापसाला 7 हजार 500 ते 8 हजार 200 रुपयांचा दर
दरम्यान, केंद्र सरकारनं कापसाची किमान आधारभूत किंमत 6 हजार 380 रुपये निश्चित केली आहे. या एमएसपीला शेतकरी अपुरे किंमत म्हणत आहेत. एवढ्या रकमेवर कापसाचा खर्चही व्यवस्थित निघत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले. दर कमी असल्यामुळं बाजारात विक्रीसाठी कमी कापूस जात आहे. सध्या 7 हजार 500 ते 8 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकला जात आहे. येत्या काही दिवसांत कापसाची मागणी वाढल्यास त्याचे दरही सुधारतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
कापसाच्या दरात दोन हजार रुपयांची घसरण
अतिवृष्टी, पूर, परतीचा पाऊस यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. हाती आलेली शेतकऱ्यांची उभी पिकं उद्ध्वस्त झाली होती. बिहार, झारखंडमध्ये पीके दुष्काळाच्या तडाख्यात सापडली होती. त्याचवेळी खरीप हंगामाच्या अखेरीस झालेल्या पावसानं कापसाबरोबरच भातशेतीच देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं. या नैसर्गीक आपत्तीतून दिलासा मिळाल्यावर पिकांवर कीड रोगांचाही प्रादुर्भाव झाला होता. यामुळं उत्पादनात मोठी घट झाली आहे. सध्या महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये कापसाचे दर घसरले आहेत. क्विंटलमागे दोन हजार रुपयांहून अधिकची घट झाली आहे. मात्र, लवकरच कापसाच्या दरात वाढ होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं अभ्यासकांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या: