Coronavirus | कोरोनाचा महाराष्ट्रात चौथा बळी; वाशीमध्ये 65 वर्षीय महिलेचा मृत्यू
संपूर्ण जगभरात हैदोस घालणारा कोरोना व्हायरस सध्या भारतातही धुमाकूळ घालतोय. अशातच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असून मृतांचा आकडा 4 वर पोहोचला आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. नवी मुंबईतील वाशी खासगी रूग्णालयात या कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाने एकूण चार जणांचे बळी घेतले आहेत. दरम्यान, ही महिला गोवंडित राहणारी असून तिला वाशीमधील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 122 वरून 130 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 23 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे. तसेच काल मुंबई, सांगली, नवी मुंबई इत्यादी ठिकाणी कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली.
सध्या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 649 कोरोना बाधित असून त्यातील 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये 112 रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत देशात लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओ : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 128 वर, 24 तासात 21 नवे रुग्ण
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी : मुंबई शहर आणि उपनगर - 51 पिंपरी चिंचवड मनपा - 12 पुणे मनपा - 19 नवी मुंबई - 5 कल्याण - 5 नागपूर - 4 यवतमाळ - 4 सांगली - 9 अहमदनगर - 3 ठाणे - 3 सातारा - 2 पनवेल- 1 उल्हासनगर - 1 औरंगाबाद - 1 रत्नागिरी - 1 वसई-विरार - 1
जगभरातही कोरोनाचा हैदोस
जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. चीनमध्ये स्थिती आटोक्यात आली असली तरी इटली, स्पेन, अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जगभरात जवळपास पावणेपाच लाख लोक कोरोनाबाधित झाले आहेत. तर 21 हजार 200 लोकांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. तर दिलासादायक बाब अशी की, आतापर्यंत 1 लाख 15 हजार रुग्ण बरे झाले आहेत. तरी अजून जवळपास तीन लाख 33 हजार कोरोनाचे रुग्ण जगभरात आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे जवळपास 14 हजार 733 जण गंभीर आहेत. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 46 हजारांची तर बळींच्या आकड्यात 2306 ची भर पडली आहे.
संबंधित बातम्या :
पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा : अनिल देशमुख
परिस्थितीचा कोणीही संधी म्हणून उपयोग करू नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे India lockdown : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली कोरानाची नवीन परिभाषा