Maharashtra Coronavirus | कोरोनाला दोनदा हरवणारा 90 वर्षांचा पैलवान!
कोरोनाचा संसर्ग झाला की अनेकजण खूप घाबरतात. मात्र, बीड जिल्ह्यातील एका 90 वर्षांच्या आजोबांनी एकदा नाही तर दोनदा कोरोनावर मात केली आहे.
![Maharashtra Coronavirus | कोरोनाला दोनदा हरवणारा 90 वर्षांचा पैलवान! coronavirus Update: 90 year old wrestler who recover twice from Coronavirus from beed district Maharashtra Coronavirus | कोरोनाला दोनदा हरवणारा 90 वर्षांचा पैलवान!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/21/4cbd6431a9e6723ebce3f3f205ba6781_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : कोरोनाने सध्या सर्वत्र हाहाकार माजविला असून दररोज हजारो बाधित आणि मृत्यूच्या येत असलेल्या आकडेवारीमुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे. मात्र, योग्यवेळी औषध उपचार घेतल्याने कोरोना बरा होतो हे दाखवून दिलं आहे बीड जिल्ह्यातल्या आडस गावच्या एका नव्वद वर्षाच्य पैलवानाने.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने बीड जिल्ह्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असल्याचं दिसून येतं आहे. दररोज हजारच्या पुढं कोरोना बाधितांचा आकडा पाहून मनाचा ठोका वाढत आहे तर सोबतच मृत्यू आणि त्यांच्या अग्नी दिलेले फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत. हे पाहून माणसांच्या मनांचा थरकाप उडाला असून कोरोना म्हणजे मृत्यू असाच समज झाला आहे. यामुळे आज प्रत्येकजण कोरोनाच्या दहशतीने घाबरून गेलेलं दिसत आहे. मात्र, याकाळात सर्वांना कोरोना विरोधात लढण्यासाठी बळ देणारी आणि मनातील कोरोनाची भीती घालविणारी घटना अंबाजोगाईमध्ये घडली आहे.
आडसचे पांडुरंग आत्माराम आगलावे (वय 90 वर्ष) यांना सहा महिन्यात दोनवेळा कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले. पण अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आणि अनेक संकटांचा मुकाबला करुन वाघासारखे काळीज कोरोनाला काय भीक घालणार! पहिला हल्ला 13 नोव्हेंबर 2020 रोजी दिवाळीच्या पहिल्या पाण्याच्या दिवशी केला. केज येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन 10 व्या दिवशी ते ठणठणीत होऊन आपल्या घरी परतले.
त्यानंतर 30 मार्च 2021 रोजी कोरोना प्रतिबंधित लस घेतली, सर्दी, खोकला असल्याने कोरोना चाचणी केली असता 3 एप्रिल रोजी कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. ही सहा महिन्यातील दुसरी वेळ होती. मात्र, यावेळी कोरोनाने त्यांच्यावर पकड मजबूत केली. यावेळी त्यांचा HRCT (एचआरसीटी) स्कोर 18/25 होता. त्यामुळे श्वासही घेता येत नव्हता तर घरातील व्यक्ती तर हे सर्व पाहून घाबरून गेलेले. मात्र, पांडुरंग आगलावे हे जुन्या काळातील पैलवान शरिरातील बळ संपलं तरी मन घट्ट असल्याने असा डाव टाकला की, कोरोनाला चीतपट करून लोळविले.
14 व्या दिवशी 17 एप्रिल शनिवार रोजी ते ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. दोनवेळा कोरोनाला चीतपट करणारे पांडुरंग आगलावे यांचा तरुणांनी आदर्श घेण्याची गरज आहे. कोरोना हा घाबरणाऱ्यांवरच जास्त अटॅक करतो. त्यामुळे कोरोनाला न घाबरता सामोरे जा. याहीपेक्षा कोरोना होऊ नये म्हणून मास्क, सुरक्षित अंतर, सतत हात धुणे यासह शासन, प्रशासन करत असलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पांडुरंग आगलावे याना कोणताही आजार नाही. उपचारादरम्यान त्यांनी दहा दिवस दवाखान्यात देण्यात येणार आहार घेतला आहे. मात्र सध्या ही ते दररोज पाच वाजता पहाटे उठून तीन किलोमीटर फिरायला जातात. अंघोळ ही पहाटेच करतात. कोणतीही गोळी, औषध पुर्वीचे सुरू नाही. पण ते पाणी खूप पितात रात्रीत पाच लिटर पाणी लागते. ही पुर्वी पासूनची सवय आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)