Lockdown | लॉकडाऊनमधील वेळेचा सदुपयोग करत केली पाणीटंचाईवर मात!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकं घरांमध्ये बंद आहेत. अशातच नांदेडमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने लॉकडाऊनच्या काळात पाणी टंचाईची समस्या कायमची दूर केली आहे.
नांदेड : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये सेलिब्रिटीपासून खेळाडूंपर्यंत कोण घरात राहून काय करत आहे. हे आपण टिव्ही चॅनल्सवर पाहतोच आहोत. कुणी आपले छंद जोपासले तर कोणी अनेक क्रिएटिव्ह गोष्टी ट्राय केल्या. पण नांदेडमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने लॉकडाऊनच्या काळात पाणी टंचाईची समस्या कायमची दूर केली आहे.
मंगल प्रसंगात वाजवले जाणारे ढोल-ताशे आता घराच्या कोपऱ्यात धूळखात पडले आहेत. हे वाद्य वाजवूनच देवके परिवाराचा चरितार्थ चालतो. पण कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि देवके परिवार घरात बंद झाला. मंगल कार्यावर मर्यादा आल्याने त्यांच्या हातचे काम तात्पुरते बंद झाले. घरात उपजीवीकेसाठी पुरेशी साधनसामुग्री असल्याने जगायची अडचण आली नाही. पण घरात बसून कंटाळा मात्र नक्की आला. गावापासून थोडेसे दूर पाण्यासाठी देवके परिवाराला जावे लागायचे. मग या लॉकडाऊनमध्ये ही समस्या दूर करण्यासाठी चक्क विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. बाप लेकाने अंगणात 4 दिवस 16 फूट विहीर खोदली आणि जलदेवता प्रसन्न झाली.
पाहा व्हिडीओ : अहमदाबादमधील पुरातन अद्भुत विहीर 'अडालज की बावडी' ची अनोखी सफर
किनवट तालुका हा सागवानाच्या जंगलाने व्यापलेला आहे. त्यातही देवके यांचे मुळझरा हे गाव तर घनदाट जंगलाने वेढलेले आहे. त्यामुळे जमिनीत पाण्याची पातळी चांगली आहे. फक्त नळ योजना नसल्याने पाण्यासाठी गावाबाहेर जावे लागते. जेव्हा आपल्या वडिलांनी विहीर खोदण्याची सुरुवात केली तेव्हा त्यांच्या मुलाने देखील वडिलांना मदत केली. वडिलांनी खड्ड्यात उतरून खोदकाम करायचे आणि मुलाने खोदलेली माती दूरवर नेवून टाकायची असा हा कामाचा क्रम होता.
अवघ्या 16 फुटांवर पाणी लागल्याने आता देवके कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही. अंगणातील विहीर असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिमेंट कठडे बसवणे आवश्यक आहे. आता हे सिमेंट कठडेही देवके परिवाराचं घरीच तयार करत आहे. लॉकडाऊनमध्ये केवळ घरात बसणं, जेवणे झोपणे यांसारख्या गोष्टी न करता देवके कुटुंबाने वेळ तर घालवला पण त्यातून पाणी टंचाईची समस्याही कायमची मिटवली. देवके परिवाराच्या या मोलाचे आता गावकऱ्यांनाही कौतुक आहे. त्यांची विहीर पाहण्यासाठी गावातील मंडळी आता विहिरी भोवताल गोळा होत आहेत. एरव्ही पंचक्रोशीत फारसे कुणाला माहित नसलेले देवके आता पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले आहेत.
संबंधित बातम्या :
वैद्यकीय परीक्षांबाबतची अनिश्चितता दूर करा; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
निसर्ग चक्रीवादळ आणि एकूणच चक्रीवादळांबद्दल महत्त्वाची माहिती!