वैद्यकीय परीक्षांबाबतची अनिश्चितता दूर करा; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच राज्यातील अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अशातच वैद्यकीय परीक्षांबाबतची अनिश्चितता आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तातडीने निर्णय घेऊन दूर करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
लातूर : राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत सध्याच्या परिस्थितीत संभ्रम निर्माण झाला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन ही अनिश्चितता दूर करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांना दिले आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी हे निर्देश दिले आहेत.
नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येतात. यामध्ये मेडिकल, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी त्याचप्रमाणे नर्सिंग परीक्षांचाही समावेश आहे. मात्र सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पालक यांना परीक्षांबाबत आरोग्य विज्ञान विद्यापीठ काय निर्णय घेणार याबद्दल कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाने स्पष्ट भूमिका घेऊन याबाबतची अनिश्चितता तातडीने दूर करावी, अशी अपेक्षाही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
पाहा व्हिडीओ : पावसाळ्यात कोरोनाला दूर ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? कशी घ्यावी काळजी?स्पेशल रिपोर्ट
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा निर्णय राष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या केंद्रीय परिषदांवर अवलंबून असतो, हे खरे असले तरीही या संस्थांशी तातडीने विचारविनिमय करून परीक्षांबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिल्या आहेत.
वैद्यकीय सेवेसाठी चार हजार डॉक्टर्स तातडीने उपलब्ध करणार : अमित देशमुख
महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी 2019 मध्ये एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या आणि इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सद्यःपरिस्थितीत तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलकडे नोंदणी करता येणार असून सुमारे चार हजार डॉक्टर्स सध्याच्या कोविडजन्य परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. यासंदर्भात इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या या विद्यार्थ्यांना तातडीने तात्पुरती पदवी प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी या डॉक्टरांच्या सेवा वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये घेणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या :