Coronavirus : पालघरमध्ये नवजात मुलीला कोरोनाची लागण; जव्हार रुग्णालयात दाखल
Coronavirus : पालघरमध्ये अवघ्या पंधरा तासांपूर्वी जन्मलेल्या एक नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या या बाळावर उपचार सुरु आहेत. नवजात बालकाला कोरोना झाल्याची पालघर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना समोर आली आहे.
पालघर : देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्याप सुरुच आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असली तरी मृतांचा आकडा मात्र धडकी भरवणार आहे. अशातच कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही, तोपर्यंत तिसऱ्या लाटेच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. अशातच तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अनेक बालकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अशातच पालघरमध्ये अवघ्या पंधरा तासांपूर्वी जन्मलेल्या एक नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या या बाळावर उपचार सुरु आहेत.
पंधरा तासांपूर्वी जन्माला आलेल्या नवजात मुलीला कोरोनाची लागण झाल्याच समोर आल आहे. नवजात बालकाला कोरोना झाल्याची पालघर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना समोर आली आहे. पुढील उपचारासाठी या बलिकेला जव्हार येथील पतंग शहा कुटीर रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
पालघर तालुक्यातील दारशेत येथील रहिवासी अश्विनी काटेला असे मातेचे नाव आहे. या मातेची पालघर शहरातील एका खाजगी रुग्णालयात मुदतपूर्व प्रसूती झाली होती. जन्माला आलेले नवजात बाळ वजनाने कमी असल्याने तिला पालघरमधील दुसऱ्या एका रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे या बाळाची अँटिजन चाचणी सकारात्मक (पॉझिटिव्ह) आली. माता मुदतपूर्व प्रसूत झाल्याने तिच्यावर उपचार सुरु आहेत, अशी त्या खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे. मातेची कोरोना अँटिजन चाचणी मात्र नकारात्मक (निगेटिव्ह) आहे.
बालक मुलीला कोरोना असल्याचे समोर आल्यानंतर पालघर ग्रामीण रुग्णालयात तिला आणले गेले. तेथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून जव्हार ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेने पाठविण्यात आले. बाळाची प्रकृती स्थिर असली तरी काही गुंतागुंत असल्याने त्यावर जव्हार रुग्णालयात उपचार देणे सोयीचे जाईल, असे ग्रामीण रुग्णालयात असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :